
खेळ असो की मानवी जीवन. आयुष्यात कोणतेही स्वप्न एकटय़ाने पूर्ण करता येत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालल्यावर स्वप्ने साकार करणे सोपे जाते. मग सर्व अपयशानंतरही आपण प्रयत्न करणे थांबवत नाही. कुटुंब आणि मित्रांची साथ महत्त्वाची आहे. कारण ते कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभे असतात, असा यशाचा गुरुमंत्र टीम इंडियाचे ‘महागुरू’ राहुल द्रविड यांनी कोलकात्यात हिंदुस्थानी संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघावर टी-20 मालिकेत 3-0 असा निर्भेळ विजय मिळवल्यावर बोलताना दिला.
संघर्ष कधीच सूडाचा नसावा
संघर्ष कधीच सूडाचा नसावा. आम्ही बदला घेण्यासाठी खेळत नाही, सन्मान आणि अभिमानासाठी खेळतो. देवावर विश्वास ठेवा. तो उशिरा का होईना आपल्याला नक्कीच साथ देतो हे तत्त्व जीवनात अमलात आणल्यास कितीही मोठय़ा अपयशाच्या गर्तेतून बाहेर येऊन आपण यशोमंदिराकडे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन द्रविड यांनी केले.
‘क्रिकेटचा खेळ तुम्हाला नेहमीच हताशेतून बाहेर पडण्यास मदत करतो. एखाद्या दिवशी आपण चांगले खेळतो, तर एखाद्या दिवशी वाईट. खेळाच्या पद्धतीही अनेक असतात. त्यामुळे चांगल्या-वाईट परिस्थितीला तोंड देण्याची सवय खेळाडूला लागते.
– राहुल द्रविड


























































