जहांगीर कलादालनात व्याघ्रजीवन अवतरले; छायाचित्रकार हेमंत सावंत यांचे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाघांचे विविध मूडस् टिपणारे छायाचित्रकार हेमंत सावंत यांचे छायाचित्र प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर कलादालनात सुरू झाले आहे. आनंदी —आळस देणारा तर कधी आक्रमक अन् चपळ वाघ, कधी ऐटबाज चालीचा तर कधी मित्रांसोबत पाण्यातून धावणारा वाघ आपल्याला येथे दिसतो. आपल्या पिल्लांची काळजी घेणारी कुटुंबवत्सल वाघीणही भेटते.  व्याघ्र जीवनशैलीचे दर्शन घडवणाऱया या प्रदर्शनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेमंत सावंत यांनी कान्हा, बांधवगड, पन्हा, मेळघाट, ताडोबा, पेंच, रणथंबोर, जिम कॉर्बेट या जंगलात जाऊन व्याघ्र जीवनशैलीचा अभ्यास करीत फोटोग्राफी केलेली आहे. प्रदर्शनात 50 छायाचित्रे मांडण्यात आली असून त्यांच्या अनुभवांची  फिल्म तयार करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार काकूभाई कोठारी, तसेच माजी मंत्री सुरेश शेट्टी व वन्यजीव छायाचित्रकार गिरीश मिस्त्री, सुलेखनकार अच्युत पालव उपस्थित होते. देशातील वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन मदत करेल. तसेच मुलांमध्ये वन्यजीवांविषयी आकर्षण निर्माण होईल, असे मुकुल वासनिक या वेळी म्हणाले.

2016 मध्ये माझी मुलगी सलोनी माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट बनली आणि तिने मला वन्यजीव फोटोग्राफीच्या जगात खेचले. माझा हा छोटासा प्रयत्न भावी पिढय़ांना मार्गदर्शन करणार असेल तर माझे काम सार्थकी लागले आहे, अशा भावना हेमंत सावंत यांनी व्यक्त केल्या. हे प्रदर्शन 23 ते 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.