फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हार्दिक पांडय़ा काही काळ क्रिकेटपासून दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ा सध्या दुखापत आणि टीकेच्या वादळात सापडला आहे. यंदाच्या टी-20  विश्वचषकातील पांडय़ाच्या फ्लॉप शोमुळे त्याचे चाहतेही त्याच्यावर नाराज आहेत. मात्र आता हार्दिकने आपण सध्या फिटनेसवर लक्ष पेंद्रित करणार असल्याने काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपली दुखापतीची व्यथा बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीलाही कळवली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे 2019 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पांडय़ा हिंदुस्थान आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी गोलंदाजी करू शकलेला नाही.

‘क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार हार्दिकचे लक्ष गोलंदाजीमध्ये पुनरागमन करण्यावर आहे आणि त्याने निवड समितीला त्यासाठी  वेळ देण्यास सांगितले आहे. पांडय़ा हा टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी  संघाचा भाग होता, पण तो 5 सामन्यांत केवळ  दोनदाच  गोलंदाजी करू शकला. ज्यामध्ये त्याला यश मिळाले नसल्याने त्याच्या अष्टपैलूत्वावरच वरिष्ठ क्रिकेटपटूंनी शंका व्यक्त केली आहे.