डॉ. सुभाष पवार 67 व्या वर्षी ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या जगातील अत्यंत खडतर ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱया वाऱयाशी सामना करीत नाशिकचे उद्योजक महेंद्र छोरिया आणि प्रशांत डाबरी यांनी देदीप्यमान यश मिळविले. ते दुसऱयांदा या किताबाचे मानकरी ठरले आहेत. विशेष म्हणजे उत्तर अमेरिकेत कालच पार पडलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिकचे 67 वर्षीय डॉ. सुभाष पवार हे देखील यशस्वी झाले. 67व्या वर्षी हा किताब जिंकणारे डॉ. पवार हे पहिलेच हिंदुस्थानी असून, त्यांची जिद्द आणि मनोबल सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान सर्वार्थाने स्पर्धकांची परीक्षा पाहणारे ठरले. यात 3.8 किलोमीटर स्विमिंगसाठी हिंद महासागरात 15 ते 17 फूट उंच उसळणाऱया लाटांवर स्वार होणे स्पर्धकांची कसोटी होती. 180 किलोमीटर सायकलिंगच्या वेळी देखील 50 ते 60 किलोमीटर प्रतीतास वेगाने वाहणारे वारे होते.

डॉ. पवार यांचे यश प्रेरणादायी

डॉ. सुभाष पवार हे चार महिन्यांपूर्वी जर्मनीतील हॅम्बर्ग येथील स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र, निर्धारित वेळेपेक्षा अगदी थोडय़ा फरकाने त्यांना यशाने हुलकावणी दिली. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको येथील स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला. स्विमिंग, रनिंग, सायकलिंग हे लक्ष्य त्यांनी 15 तास 11 मिनिटांत पूर्ण करीत किताब जिंकला. त्यांचे साहस आणि मनोधैर्य थक्क करणारे असून हे यश मिळवणारे ते पहिलेच वयोवृद्ध हिंदुस्थानी ठरले आहेत.