
‘भाजप हटाव, देश बचाव’ असा नारा देत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील प्रादेशिक पक्षांची एकजूट करून भाजपचा पराभव करण्यासाठी लढय़ाचे रणशिंगच फुंकले. चिंता करू नका, सगळं व्यवस्थित होईल… 2024च्या निवडणुकीत ‘खेला होबे… आता लढा अटळ आहे. सज्ज व्हा!’ असेही त्यांनी पुढे सांगितले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱयावर आहेत. बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी ममता बॅनर्जी यांनी संवाद साधला. यावेळी जावेद अख्तर, माजिद मेमन, मेधा पाटकर, रिचा चढ्ढा, मुनव्वर फारुखी, महेश भट, शत्रुघ्न सिन्हा आदी उपस्थित होते. ‘भाजप अजेय नाही’ असे सांगतानाच आधी देश वाचवायला हवा. त्यासाठी राजकीय पक्ष लढतीलच, पण सर्वसामान्य लोकांनीही एकत्र येऊन आपली ताकत दाखवायला हवी, असे प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी केले.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ममतांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना तृणमूलमध्ये प्रवेश दिला. मेघालयात काँग्रेसच्या 17 पैकी 12 आमदारांना तृणमूलने जवळ केले. या पार्श्वभूमीवर ममतांना काँग्रेसशी असलेल्या नात्याविषयी विचारले तेव्हा राहुल गांधी यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या, ‘मी एक साधी कार्यकर्ती आहे. मला एवढच समजतं की राजकारण गंभीरपणे करायचं असतं. तुम्ही सतत परदेशात राहणार आणि इथलं राजकारण करणार हे शक्य नाही. विविध क्षेत्रांतील जाणकारांचे सल्लागार मंडळ बनवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया असं मी काँग्रेसला सुचवलं होतं. पण माझे सर्व प्रयत्न वाया गेले.
‘तृणमूल उत्तर प्रदेशात निवडणूक लढवत नाहीय’, असे सांगून ममता पुढे म्हणाल्या, ‘मतविभागणी नको म्हणून मी हा निर्णय घेतला. पण पश्चिम बंगालमध्ये काँगेस आणि सीपीआय या दोघांनी माझ्या उमेदवारांविरुद्ध उमेदवार दिले. मग गोव्यात मी काँग्रेसविरुद्ध का लढायचं नाही?’
सल्लागार मंडळ बनवा!
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे, विचारवंतांचे आंदोलकांचे एक सल्लागार मंडळ बनवा. या सल्लागार मंडळाने देशभरातील विचारवंतांना एकत्र आणण्याचं काम करावं. राजकीय पक्षांना मार्गदर्शन करावं, अशी सूचना ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.
जाता जाता मोदी सगळे विकताहेत!
नफ्यातील अनेक सरकारी उपक्रम मोदी सरकार विकत आहे. याविषयी छेडले असता ममता म्हणाल्या, हे दाहक वास्तव आहे. ‘जाता जाता’ ते सगळं विकताहेत, पण आपण त्यांना देश विकण्यापासून रोखूया!’
पंतप्रधानपदाचे नंतर बघू
विरोधकांची एकजूट घडवून आणल्यानंतर भाजपचा पराभव झाल्यास ‘तुम्ही पंतप्रधानपद स्वीकाराल का?’ या प्रश्नावर ममता म्हणाल्या, ‘पंतप्रधानपदाचं नंतर बघू. आधी लोकशाही वाचवूया. भाजपला या देशातून ‘राजकीयदृष्टय़ा’ संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यासाठीच सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.
सरकार घाबरले!
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ होती. पण त्यांनाही देशाची माफी मागावी लागली, याचा उल्लेख करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘मोदीजी को भी कभी कभी डर लगता है.’ निवडणुका आल्यावर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करतात. ही भीतीच तर आहे. तीनही कृषी कायदे त्यांना मागे घ्यावे लागले. माफी मागावी लागली. शेतकऱ्यांना तेही घाबरलेच. भले त्यांनी कोणत्याही चर्चेविना हे कायदे संसदेत रद्द केले. उत्तर प्रदेश निवडणुकीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेलही, पण सरकार घाबरले हेही खरेच. सरकारपेक्षा जनतेची ताकत मोठी आहे हेच यामुळे सिद्ध झाले.
सीबीआय, ईडीचा गैरवापर थांबवू
यूएपीएसारख्या कायद्याचा सरकार गैरवापर करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारकडून सीबीआय, ईडी आणि आयटीसारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांना दडपण्यासाठी केला जातोय. पण भाजपचा पराभव करून आलेल्या नव्या सरकारमध्ये हा गैरवापर थांबवू असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘माझ्या सर्वच नातेवाईकांना नोटिसा पाठवून झाल्या आहेत. सरकार स्वतः घाबरले आहे, ते आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. पण मी घाबरणार नाही. जिवंत आहे तोवर त्यांना टक्कर देणार, लढणार.’
‘मराठी’ शुभेच्छा!
ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीलाच मराठीतून शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्राच्या प्रबुद्ध जनतेला माझे विनम्र अभिवादन. हार्दिक शुभेच्छा!
‘त्या’ अंत्यविधीचे पैसे मिळाले का?
पश्चिम बंगालमध्ये अंत्यसंस्कारासाठी 2 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली होती. हा धागा पकडत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना विचारले, ‘अलीकडेच विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कुणावर तरी ‘राजकीय’ अंत्यसंस्कार केलेत त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का?’ जावेद अख्तर यांच्या या प्रश्नातील खोच लक्षात घेऊन सभागृहात हशा पिकला. ममता यांनीही त्यांना हसून दाद दिली.
काँग्रेस निर्णय घेत नाहीय
भाजपविरोधी आघाडी बनवायला हवी. त्यात सर्वच पक्ष हवेत. पण काँग्रेस निर्णय घ्यायला का घाबरतेय, कळत नाहीय, असे मत ममता यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या बोटचेप्या धोरणामुळेच देशात भाजप वाढण्यास मदत झाल्याचे नमूद करून ममता बॅनर्जी म्हणाल्या, गेली 8 वर्षे मी हेच बघतेय. शेवटी मांजराच्या गळय़ात कोणीतरी घंटा बांधायला हवीच ना, म्हणून मी बाहेर पडलेय. मी एका ध्येयाने बाहेर पडलेय. फिरतेय. निदान माझं बघून तरी इतर समविचारी लोक सामील होतील. तेही उघडपणे लढायला तयार होतील.
महाराष्ट्रात लढणार नाही!
गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांत तृणमूल निवडणूक लढणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केले होते, पण महाराष्ट्रात मात्र लढणार नसून इथल्या मित्रपक्षांना मदत करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई दौऱयावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन देशातील राजकीय स्थितीवर चर्चा केली.
भाजपला देशात सक्षम पर्याय उभारणार; शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्या भेटीत एकमत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. सगळ्यांनी मिळून भाजपला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे यासाठीच ही भेट होती. यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामधील बैठकीची गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीविषयी शरद पवार म्हणाले, ममता बॅनर्जी यांच्या इथे येण्यामागे साहजिकच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत. अनेक साधर्म्य या दोन राज्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर समान विचारांच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आदी उपस्थित होते.
ज्यांची मेहनत घेण्याची तयारी, त्यांना सोबत घेणार
काँग्रेसशिवाय पर्याय उपलब्ध करणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही. भाजपविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल तर त्यांचे स्वागत आहे. नेतृत्व हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, आमच्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा विषय आहे. कुणाचे नेतृत्व वगैरे ही दुय्यम बाब आहे. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा मुद्दा आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे, सगळ्यांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन चालायचे, असे शरद पवार यांनी यावेळी नमूद केले.
यूपीएव्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार – ममता बॅनर्जी
पत्रकारांनी यूपीएशिवाय पर्याय निर्माण करणार का, असा प्रश्न विचारला असता कुठे आहे यूपीए असा उलट सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. आता यूपीए असं काही राहिलं नाही. ज़ो फिल्डमध्ये राहून तळागाळात उतरून लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली. भाजपविरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीएव्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिले.


























































