निलंबन आदेश स्वीकारण्यास परमबीर सिंह यांचा नकार, न्यायालयात जाण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेल्या गुह्यांची गंभीर दखल घेत गृह विभागाने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. बेशिस्त वर्तणूक आणि नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईचा आदेश स्वीकारण्यास परमबीर यांनी नकार दिला आहे. आपल्याविरुद्धची कारवाई ही बेकायदेशीर असून याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गृह विभागाने परमबीर सिंह यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा आदेश पोलीस महासंचालकांकडून काढण्यात आला आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी सेवाज्येष्ठतेनुसार हा आदेश आपण स्वीकारणार नसल्याच स्पष्ट केले आहे. आपण स्वतः पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकारी आहोत. त्यामुळे पोलीस महासंचालक आपल्याला निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हा आदेश आपल्याला देऊ शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

  • खंडणी, अपहरण आणि जातिवाचक शिवीगाळप्रकरणी मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
  • मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटविल्यानंतर परमबीर सिंह यांची गृहरक्षक दलात बदली करण्यात आली होती. मात्र, बदलीच्या ठिकाणी ते हजर झालेले नाहीत.
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणाच्या आरोपाबाबत गुन्हे शाखा आणि चांदीवाल आयोगाकडूनही त्यांची चौकशी सुरू आहे.

बचावासाठी तांत्रिक कारण पुढे

राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत. त्यामुळे ते सध्या तरी परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा आदेश देऊ शकणार नाहीत. बचावासाठी असे तांत्रिक कारण पुढे करणाऱया परमबीर सिंह यांच्याबाबत गृह विभाग कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपण स्वतः पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकारी आहोत. त्यामुळे पोलीस महासंचालक आपल्याला निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही.