बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी उत्थानासाठी केलेले कार्य वंदनीय! महापौरांच्या हस्ते सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानवी उत्थानासाठी केलेले कार्य चिरंतन आणि वंदनीय असल्याचे प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीजवळील नियंत्रण कक्षात पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीच्या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौरांच्या हस्ते आज करण्यात आले.

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी येतात. त्यांना महापालिकेच्या वतीने विविध सेवासुविधाही पुरवल्या जातात. कोरोना विषाणूचा तसेच नवीन ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अनुयायांचे विशेष आभारही महापौरांनी यावेळी मानले. महापौर यावेळी म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असणारे ‘चैत्यभूमी’ हे प्रेरणादायी स्थळ आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे या व्यासपीठावर आम्ही विराजमान आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग व संपूर्ण मानव समाजासाठी त्यांचे असलेले भरीव योगदान सदैव प्रेरणादायी आहे. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, उपायुक्त (परिमंडळ-2) हर्षद काळे, ‘जी-उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह नागसेन कांबळे, रमेश जाधव, रवी गरुड, प्रतीक कांबळे यांच्यासह अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.