
अँटिलिया स्कॉर्पियो प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्रिकेट बुकी नरेश गौर याला विशेष न्यायालयाने अंतिम जामीन मंजूर केला असून काही कारणास्तव त्या जामिनाला 25 दिवसांसाठी स्थगिती दिली. मात्र पूरक कारण असल्याशिवाय जामिनाला स्थगिती देण्याचा कनिष्ठ न्यायालयाला अधिकार नाही, असा युक्तिवाद नरेश गौर याच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान, या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या बुधवारी आपला निकाल सुनावणार आहे.
या प्रकरणात बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, विनायक शिंदे, क्रिकेट बुकी नरेश गौर, प्रदीप शर्मा, रियाजुद्दीन काझी, सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठकुरी आणि मनीष सोनी या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सचिन वाझेला गौर याने सीमकार्ड पुरवल्याच्या आरोपाप्रकरणी गौर याला अटक करण्यात आली आहे.



























































