हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले; CDS Bipin Rawat यांचे निधन, 12 वरिष्ठ लष्करी अधिकाऱयांसह 13 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाले आहे. तामीळनाडूतील निलगिरी हिल्स परिसरात कुन्नूर येथील जंगलात हवाई दलाचे हेलिकॉप्टर एमआय-17 व्ही-5 कोसळले आणि आग लागली. या भयंकर अपघातात जनरल रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकारी आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टर अपघात झाला. वेलिंग्टन लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. या दुर्घटनेमुळे सैन्यदलाची अपरिमित हानी झाली असून, अवघ्या देशभरात तीव्र शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, एक लष्करी अधिकारी बचावला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • जनरल बिपीन रावत हे सकाळी 8.47 वाजता दिल्ली विमानतळावरून विशेष विमानाने तामिळनाडूत सुलूर येथे जाण्यासाठी निघाले. त्यांच्या समवेत पत्नी मधुलिका रावत, काही वरिष्ठ लष्करी अधिकारी होते.
  • निलगिरी हिल्स येथील वेलिंग्टन येथे लष्कराच्या स्टाफ कॉलेज येथे कार्यक्रमासाठी ते जात होते.
  • 11.48 वाजता सुलूर येथून एमआय-17 व्ही-5 या लढाऊ हेलिकॉप्टरमधून जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी वेलिंग्टन येथे स्टाफ कॉलेजला जाण्यासाठी निघाले.
  • दुपारी 12.22 वाजता हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला. दाट धुके आणि लो व्हिजिबिलीटी (कमी दुष्यमानता) यामुळे हेलिकॉप्टर कोसळले आणि आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे. कन्नुर परिसरातील जंगलात ही दुर्घटना दुपारी 12.22 ला घडली. दुपारी दोनच्या सुमारास भयंकर अपघाताचे वृत्त देशभरात धडकले.
  • दुपारी चारपर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने स्पष्ट केले. त्यात जनरल बिपीन रावत यांच्या पत्नीचा समावेश होता. जनरल बिपीन रावत यांच्यावर वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सायंकाळी सहा वाजता जनरल रावत यांची प्राणज्योत मालवली. जनरल रावत यांचे निधन झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आणि अवघा देश शोकसागरात बुडाला.

ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांच्यावर उपचार सुरू

हेलिकॉप्टरमध्ये जनरल रावत यांच्यासह 14 जण होते. 13 जणांचा मृत्यू झाला असून, ग्रुप कॅप्टन वरूणसिंह हे सुदैवाने बचावले आहेत. वरूण सिंह यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहे असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

या अधिकाऱयांचा मृत्यू

जनरल बिपीन रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पी. एस. चौहान, स्क्वॉड्रन लिडर के. सिंह, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्रकुमार, लान्सनायक विवेक कुमार व बी. तेजा, हवालदार सतपाल, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप.

देशभरात शोक

अपघाताचे वृत्त समजताच  देशात सर्वत्र चिंता व्यक्त होत होती. जनरल रावत यांच्यासह इतर अधिकाऱयांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत होती. मात्र, सायंकाळी सहा वाजता जनरल रावत यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि देश शोकसागरात बुडाला.

पहिले सीडीएस

देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’  (सीडीएस) होण्याचा  मान जनरल बिपीन  रावत यांना मिळाला होता. 2016 ते 2019 पर्यंत ते लष्कर प्रमुख होते. 30 डिसेंबर 2019 ला 61 व्या वर्षी ते सीडीएस बनले. 65 वर्षांपर्यंत ते या पदावर राहणार होते.  त्यांच्यावर  तिन्ही दलांत समन्वय राखण्याची जबाबदारी होती.

दिल्लीत वेगवान घडामोडी

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटीची बैठक झाली.
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी जनरल रावत यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. केंद्र सरकारकडून उद्या (दि. 9) संसदेत निवेदन केले जाण्याची शक्यता आहे.

घात की अपघात? उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अति वरिष्ठ पदांवरील लष्करी अधिकाऱयांचा असा अपघाती मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीडीएस जनरल रावत हे अत्यंत धाडसी अधिकारी होते. पाकिस्तान आणि चीनविरुद्ध त्यांनी धडक भूमिका घेत ठोस कारवाई केली होती. त्यांचा मृत्यू हा हिंदुस्थानी सैन्यदलासाठी मोठी हानी आहे.

ढगाळ हवामान आणि कमी दुष्यमानता यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु हा अपघात आहे की मोठा घात, हे प्रश्न उपस्थितीत होत असून, लष्कराने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.