
पर्यावरणाला हानी न पोहोचवता मुंबईच्या विकासात आणि शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे, वाहतूककोंडी फोडणारे कोस्टल रोड, मेट्रो आणि शिवडी-न्हावा शेवा हे विकास प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणार असून मुंबईकरांना त्यावरून प्रवास करता येणार आहे, असा विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित केलेल्या इन्फ्रा कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईत लोकल, बेस्ट, मोनो यासारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असूनही वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. मात्र मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम प्रगतिपथावर असून पुढील दोन वर्षांत हा रस्ता सुरू होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल, मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतूककोंडीला घाबरतात, मात्र ही कनेक्टिविटी सुरू झाली तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोस्टल रोडचे 45 टक्के काम पूर्ण
मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत या प्रकल्पाचे 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंत असा 10.58 किलोमीटरचा हा मार्ग आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि दोन बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून 2 हजार 300 टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन आणण्यात आले. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत. बोगद्याचे खोदकाम 11 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आले असून ते 2023पर्यंत पूर्ण होणार आहे.
…तर जानेवारीच्या मध्यापर्यंत मुंबईकरांचे लसीकरण शक्य
मुंबईत केंद्र सरकारच्या सहाय्याने लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत आहेत. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर जर केंद्र सरकारने लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केले तर 15 ते 20 जानेवारीपर्यंत मुंबईकरांना दुसरा डोस देऊन लसीकरण पूर्ण करता येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
n कोस्टल रोडमुळे वाहतूककोंडीतून सुटका होणार आहेच त्याचबरोबर वेळेची 70 टक्के आणि इंधनाची 34 टक्के बचत होणार आहे.
n ध्वनी आणि वायुप्रदूषणाचे प्रमाणही कमी होणार आहे.
n प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाइल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणाऱया पुलांखाली 176 खांब उभारण्यात येणार आहेत.
n कोस्टल रोडसाठी 12 हजार 700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच भराव टाकलेल्या जमिनीवर 125 एकरचे उद्यान, भूमिगत वाहनतळही बांधण्यात येणार आहे.































































