कितीही ईडी बीडी येऊद्यात, महाविकास आघाडीचे सरकार पंचवीस वर्षे राहणार; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेत हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीच्या चौकशा लावल्या म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर होईल, गडगडेल या भ्रमात कोणी राहू नये. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उत्तम प्रकारे चालत आहे. हेच सरकार आणखी पंचवीस वर्षे राहील. त्यामुळे काळजी नको, अशा शब्दांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेत महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करू पाहणाऱया केंद्रातील भाजप सरकारला सुनावले.

लोकसभेत आज केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा व दिल्ली पोलीस सुधारणा या विधेयकावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ठरवून गोष्टी केल्या जात आहेत. अनिल देशमुख यांच्यावर एका वर्षात सात वेळा ईडीने धाडी टाकल्या आहेत. एकनाथ खडसेंसह अनेकांना चौकशांच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. केवळ नेतेच नाहीत तर त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट केले जात आहे. मात्र तरीही या चौकशातून काहीच निष्पन्न होत नाही, असा टोलाही खासदार सुळे  यांनी लगावला.

आम्ही भाजपमध्ये आहोत त्यामुळे ईडी आमच्याकडे फिरकणारही नाही, असे वक्तव्य सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केले. खासदार रणजितसिंह निंबाळकर व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. याचाच अर्थ तुम्ही भाजपमध्ये असाल किंवा भाजपसोबत असाल तर सुरक्षित आहात असा होतो. एका केंद्रीय मंत्र्याने तर आमच्याकडे दोषमुक्त करण्याची जादूची पावडर आहे, असे वक्तव्य केले आहे. याचाच अर्थ सत्तेच्या जोरावर सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न करा. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार पाच नाही तर पंचवीस वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखविला.

सरकार अस्थिर करण्याचे स्वप्नही पाहू नका

ईडी आणि एनसीबीसारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे स्वप्नही केंद्रातील सत्ताधाऱयांनी पाहू नये, असा खरमरीत टोला शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी या विधेयकाच्या चर्चेदरम्यान लगावला. बिहारची निवडणूक होती तेव्हा सुशांतसिंहचे प्रकरण बाहेर काढून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आता आर्यन खानचे प्रकरण गाजत आहे. ईडीच्या धाडी वगैरे पडत आहेत, मात्र त्याला महाराष्ट्रातील सरकार धूप घालत नाही, असे खासदार राऊत यावेळी म्हणाले. गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणावर ड्रग्जचा साठा सापडला, मात्र त्यावर कुठेही कारवाई झाली नाही. महाराष्ट्रातील गोष्टींचा बाऊ करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे सरकार काही पडणार नाही. हे सरकार भक्कम आहे, असेही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी ठणकावले.