
यजमान ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या गुरुवारच्या तुफानानंतर आज तिसरा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला. कर्णधारास साजेशी खेळी करीत 158 चेंडूंत नाबाद 86 तर डेव्हिड मलानने 170 चेंडूंत नाबाद 80 धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे वादळ रोखले. रूट-मलान जोडीच्या नाबाद 159 धावांच्या भागीदारीमुळे पाहुण्या इंग्लंडने पहिल्या ऍशेस कसोटीच्या तिसऱया दिवसाअखेर 2 बाद 220 अशी दमदार मजल मारली आहे. पाहुणा इंग्लंड संघ आता फक्त 58 धावांनी पिछाडीवर आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आज 425 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर रूट आणि मलान जोडी खेळपट्टीवर खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे ही लढत आता रोमांचक स्थितीत आली आहे.
यजमान ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव कालच्या 7 बाद 343 या धावसंख्येचा 82 धावांची भर टाकून संपला. त्यामुळे इंग्लड 278 धावांनी पिछाडीवर होता. ट्रेव्हिस हेडने 148 चेंडूंत 152 धावांची दीडशतकी खेळी केली. इंग्लंडच्या वतीने रॉबिन्सनने 58 धावांत 3 तर मार्क वूडने 85 धावांत 3 फलंदाज बाद केले. ख्रिस वोक्सने 2 विकेटस् मिळवल्या. त्यानंतर इंग्लंड संघाच्या दुसऱया डावात 61 धावांत 2 फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार जो रूट आणि डेव्हिड मलान खेळपट्टीवर तळ ठोकून उभे राहिले.
दुश्मनी मैदानात, स्टेडियममध्ये नाही
मैदानात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या परंपरागत प्रतिस्पर्धी संघाची दुश्मनी आहे. पण ब्रिस्बेनच्या स्टेडियमवर इंग्लंडचा क्रिकेटशौकीन रॉब हेलने त्याची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड नतालीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. नतालीला थोडा धक्का बसला, पण नंतर तिने लगेच तो प्रस्ताव स्वीकारला. 7 क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. 2017 मध्ये ऍशेस मालिकेदरम्यान बार्मी आर्मीसह ऑस्ट्रेलियाला गेलेल्या रॉबची भेट नतालीशी झाली. तेव्हापासून त्या दोघांची जवळीक वाढली.



























































