
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आता स्वयंचलित स्मार्ट सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये वाहनांच्या गर्दीवरून स्वयंचलित पद्धतीने सिग्नल कार्यान्वित होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचीही गैरसोय टळणार आहे.
या उपक्रमात मध्य मुंबईतील ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणारा पी. डिमेलो मार्ग आणि कफ परेड परिसरातील 70 जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होणार आहेत. मुंबईतील जंक्शनवर तब्बल 652 सिग्नल्स असून त्यातील आतापर्यंत 258 सिग्नल अद्ययावत करण्यात आले आहेत, तर आता 70 सिग्नल आणखी स्मार्ट करण्यात येणार आहेत. उर्वरित 324 सिग्नल टप्प्याटप्प्याने स्मार्ट करण्यात येणार आहेत.
असा आहे उपक्रम
सिग्नल यंत्रणेच्या सध्याच्या पद्धतीत लाल, हिरवा, पिवळा अशा दिव्याचा कालावधी निश्चित केलेला असतो. मात्र आता स्मार्ट सिग्नल पद्धतीत वाहनांच्या संख्येनुसार स्वयंचलित पद्धतीने वेळ निश्चित करून काम करणार आहे.
या उपक्रमासाठी पालिका सल्लागार नेमणार आहे. यामध्ये मुंबईतील महत्त्वाच्या सिग्नलच्या ठिकाणी संपूर्ण दिवसभरात होणाऱया गर्दीचा अभ्यास करण्यात येईल.































































