
मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी इतर मागण्यांसाठी एमआयएमने शनिवारी चांदिवली येथे रॅलीचे आयोजन केले होते. विनापरवाना रॅली काढत सभा घेतल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी एमआयएमच्या सहा पदाधिकाऱयंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत रॅलीचे आयोजन केले होते. संभाजीनगर येथून हजारो कार्यकर्ते हे चांदिवली येथे सभेसाठी आले होते. शहरात ओमायक्रोनच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी शनिवार आणि रविवार दोन दिवस जमावबंदी कलम 144 लागू केले होते. जमावबंदी असतानाही खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी सभा घेतली होती. चांदिवली येथे झालेल्या सभेत हजारोजण उपस्थित होते. रॅली आणि सभेला साकीनाका पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतरदेखील सभा घेण्यात आली होती. कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी आज सकाळी साकीनाका पोलिसांनी सभेचे आयोजन करणाऱया एमआयएमच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.


























































