
लहानथोरांना वेड लावणाऱया आणि जादुई दुनियेची सफर घडवणाऱया हॅरी पॉटर पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची तब्बल 3.5 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. विसाव्या शतकातील सर्वात महागडे पुस्तक ठरले आहे. हॅरी पॉटरची पहिली आवृत्ती 1997 मध्ये प्रकाशित झाली होती. ‘हॅरी पॉटर ऍण्ड द फिलॉसॉफर्स स्टोन’ असे या ब्रिटिश आवृत्तीचे नाव आहे. त्यावर हार्ड कव्हरची बाइंडिंग होती. ही आवृत्ती नुकतीच अमेरिकेत लिलावासाठी ठेवण्यात आली होती. लिलावात या आवृत्तीला रेकॉर्डब्रेक बोली लागली आहे. कोटय़वधींना विकल्या गेलेल्या या पुस्तकाचे हेरिटेज ऑक्शनने ‘जादुई’ असे वर्णन केले आहे. ब्रिटिश आवृत्तीचे हे पुस्तक अमेरिकेमध्ये ‘हॅरी पॉटर ऍण्ड द सॉर्सरर्स स्टोन’ या नावाने प्रकाशित झाले होते.
80 भाषा ; 500 मिलियन प्रती
हॅरी पॉटरची कथा ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग यांनी लिहिली आहे. याशिवाय पुस्तकाच्या आणखी सहा आवृत्त्या लिहिल्या आहेत. जगभरात या पुस्तकाच्या 500 मिलियन प्रती विकल्या गेल्या असून त्याचे 80 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. या पुस्तकावर आधारित आठ चित्रपटही बनवण्यात आले असून ज्यांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर अब्जावधींची कमाई केली आहे.
























































