
नात्यातील अल्पवयीन मुलीस घडय़ाळ घेऊन देण्याचे आमिष दाखवून म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील जंगलात नेऊन अत्याचार करणाऱया नराधम भागोजी विठ्ठल बाऊदने (वय 37, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याला पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे या खटल्यात त्या पीडितेची आई फितूर झाली.
आरोपी भागोजी बाऊदने याने 4 नोव्हेंबर 2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीस घडय़ाळ घेऊन देतो, असे सांगून राधानगरीला नेले. परत येताना वाटेत म्हासुर्लीच्या जंगल परिसरात मित्राला भेटून जाऊया, असे सांगून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास आईला व बहिणीस ठार मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलीने चार दिवसांनी हा प्रकार आईला सांगितला. मात्र, बाऊदने गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने हे कुटुंब शांत होते. महिनाभराने पुन्हा मुलीस म्हासुर्लीला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करत असताना त्याला विरोध करताना त्याने पीडितेच्या आईला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी बाऊधनेविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी या खटल्यात 12 साक्षीदार तपासले. खटल्यात पीडित मुलीची आई फितूर झाली. मात्र, पीडित मुलगी, इतरांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडातील 40 हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. भारत शिंदे, महेंद्र चव्हाण, तपास अधिकारी उपनिरीक्षक व्ही. एन. रेळेकर, श्याम बुचडे, पैरवी अधिकारी शंकर माने यांनी या खटल्यात मदत केली.






























































