बीड जिल्ह्यातील 5 नगर पंचायत निवडणुकीत मतदारांचा उत्साह, सरासरी 80 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूर या पाच नगर पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. सरासरी 80 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 217 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले.

बीड जिल्ह्यातील 5 नगर पंचायतच्या निवडणुकासाठी मंगळवारी मतदान झाले. केज, आष्टी, पाटोदा, वडवणी, शिरूर या 5 नगर पंचायतमध्ये एकुण 85 प्रभाग संख्या होती. त्यापैकी 65 प्रभागासाठी निवडणूक झाली. एकुण 217 उमेदवार मैदानामध्ये उतरले होते. 78 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान झाले. पाचही नगर पंचायतच्या निवडणुका राजकीयदृष्टया महत्वाच्या होत्या. सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. एक एक मतदानासाठी संपर्क सुरू होता. मतदान करून घेण्यावर मोठा भर देण्यात आला होता.

केजमध्ये 60 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. आष्टीमध्ये 42, पाटोद्यात 44, वडवणीत 34 तर शिरूरमध्ये 37 उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. हायटेक प्रचारयंत्रणा राबवण्यात आली. सोशल मीडियावर प्रचाराचा सर्व भार होता. सायंकाळपर्यंत सरासरी 80 टक्के मतदान झाले होते. काही मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत रांग कायम होती. बीड जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वडवणीत मतदानाला गालबोट

सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना वडवणी शहरातील प्रभाग क्र.3 मध्ये सकाळी दहाच्या सुमारास मतदान केंद्रावर दोन गटामध्ये बाचाबाची झाली. दंगल नियंत्रण पथकाने लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.