सुजय घेतोय श्यामचा शोध 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

काही गोष्टी तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. ‘श्यामची आई’ ही कथाही यापैकीच एक आहे. त्यामुळे जेव्हा कधी ‘श्यामची आई’चा उल्लेख होतो, तेव्हा  क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. दिग्दर्शक सुजय डहाकेने ‘श्यामची आई’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्याचे ठरवले आहे. लवकरच शूटिंगलाही सुरुवात हेणार आहे. सुजय सध्या श्यामच्या शोधात आहे.

सुजय डहाकेने नुकतंच एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये श्यामच्या भूमिकेसाठी अभिनयाची आवड असलेल्या 8 ते 12 वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचे नमूद केलंय. एकूण 10 मुलांची निवड केली जाईल. त्यांना मुंबईत आणून तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाणार आहे.

 ‘शाळा’, ‘फुंतरू’, ‘आजोबा’, ‘केसरी’ असे हटके चित्रपट बनवणाऱ्या सुजयने हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत सुजयनं 15 ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली.  हा चित्रपट साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे. ही अमृता अरुण राव यांची निर्मिती आहे. चित्रपटाचे शूटिंग ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे. पुढल्या वर्षी  दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.