
दक्षिण मुंबईतील 49 एकर मोक्याच्या जागेवरील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास पुढील दोन महिन्यांत मार्गी लागेल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी विधानसभेत केली. गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत येत्या एका महिन्यात लोकप्रतिनिधी, रहिवासी व म्हाडाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने निर्णय घेऊ, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी या विषयावर लक्षवेधी मांडली. अंधेरीतील पीएमजीपी वसाहतीमधील 1 ते 17 जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पास म्हाडाने तीन वेळा देकार पत्र विकासक श्रीपती व्हेंचर्स यांना दिले; परंतु विकासकाने 11 वर्षांत प्रकल्प राबविण्याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे येथील 986 कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडा, विकासक व सोसायटी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता; परंतु अद्यापही विकासकाने ठोस निर्णय घेतला नाही. म्हाडानेही अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही असे वायकर म्हणाले. या इमारतींचा पुनर्विकास कधी होणार यावर म्हाडाची भूमिका, या प्रकल्पाचा फिजिबिलिटी रिपोर्ट तपासण्याची जबाबदारी ज्या एलोरा कंपनीला दिली आहे त्यात काय म्हटले आहे त्याची माहिती वायकर यांनी मागितली. या चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे अमिन पटेल यांनी कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाची मागणी केली.
प्रश्न कधी सोडवणार
या चर्चेत भाग घेताना सुनील प्रभू म्हणाले की, अंधेरी पीएमजीपी रहिवाशांचे निवेदनही आले होते. पूर्ण वसाहतीमध्ये पाण्याची गळती आहे.पावसाळय़ात कधी तरी पडून जीवीतहानी होईल. सभागृहात रहिवाशांना श्रद्धांजली येण्याची वेळ येऊ नये म्हणून वेळेत स्थानिक आमदार-रहिवाशांची एक बैठक घ्या. त्यातून मार्ग काढा. प्रश्न किती दिवसात संपवणार त्याचे आश्वासन सभागृहाला देण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासाठी श्रीपती व्हेंचरला दिलेले देकार पत्र रद्द केल्याचे सांगितले.
































































