विद्युत तारेचा धक्का लागल्याने चार जणांचा मृत्यू; भाजपचे राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्या महाविद्यालय परिसरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती कठोरा मार्गावर असलेल्या राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्या महाविद्यालय परिसरात विजेच्या तारेचा धक्का लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात संबंधित ठेकेदार व महाविद्यालय प्रशासनाच्या प्रमुखाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी होत आहे.

अमरावती कठोरा मार्गावर भाजपचे राज्यमंत्री प्रविण पोटे यांचे महाविद्यालय असून या महाविद्यालयात सर्वच प्रकारचे शिक्षण देण्यात येते. अभियांत्रिकी महाविद्यालय, डी फार्मसह बारावीपर्यंत सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जाते. हा परिसर मोठा असल्यामुळे या परिसरात विद्युत प्रवाहाचे काम नेहमीच सुरू असते. नेहमीप्रमाणे बुधवारीही असेच काम पोटे कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरू होते. हेच काम सुरू असताना संबंधित नोकरदारांनी काम सुरू केले. मात्र त्याचवेळी वरून जाणार्‍या जिवंत विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे अक्षय साहेबराव सावरकर (वय 25, रा.टाकळी), प्रशांत शेगोकार (वय 30, रा.शिराळा), संजय दंडनाईक (वय 45, रा.मालटेकडी), तर गोकुल साहेबराव वाघ (वय 25, रा.टाकळी) यांचा जागीच मृत्यू झाला.

या संदर्भात अधिक चौकशी केली असता संबंधित चारही जण पोटे यांच्या संस्थेत काम करत नसले तरी ते कायमस्वरूपी महाविद्यालय परिसरात काम करत असल्याचे सांगण्यात आले. घटना घडल्यानंतर कठोरा व आजुबाजुच्या परिसरातील विद्युत प्रवाह खंडीत करण्यात आला आहे. एकाचवेळी चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत कामगारांचे मृतदेह अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले असून शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी कठोरा व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. संबंधित घटनेला संस्थाचालक व ठेकेदार जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. अधिक तपास सुरू आहे.