दहावी, बारावीची परीक्षा कठीण नको! कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया दहावी, बारावीच्या परीक्षेची काठिण्यपातळी कमी करावी, तसेच बहुपर्यायी आणि कृतिपत्रिकेवर भर द्यावा, अशी मागणी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे केली आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद होत्या. आठवी ते बारावीच्या शाळा काही महिन्यांपूर्वी तर पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. पण शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी नियमित शाळेत येण्यासाठी महिन्याचा कालावधी लागला आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर अनेक विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत.

तोंडावर आलेल्या बोर्डाच्या परीक्षा पाहता कमी वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसोटीच शिक्षक पार पाडत आहेत. कमी कालावधीमध्ये संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना प्रचंड दडपण व ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षेचे स्वरूप सोपे असावे. जेणेकरून सर्वसाधारण विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविता आली पाहिजे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

निकालाचा टक्का घसरला तर शिक्षकांना दोष देणार का?

कोरोनामुळे शाळा बंद असून त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय मोडली असल्याचे राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष संजय डावरे यांनी सांगितले. गेली दोन वर्षे काही अभ्यासाचा व परीक्षेचा स्पर्श नाही असा विद्यार्थी सरळ दहावीची परीक्षा देणार आहे, तीच अवस्था बारावीच्या विद्यार्थ्यांची आहे याचा विचार व्हावा, अशी मागणीही डावरे यांनी केली. अशा परिस्थितीत निकालाचा टक्का कमी झाला तर शिक्षकांना त्याचा दोष देणार का, ऑनलाइन शिक्षण हे परिपूर्ण शिक्षण होऊ शकत नाही. त्यातच 60 टक्के विद्यार्थी हे ऑनलाइनपासून वंचित राहिलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.