सोलापूरकरांनी थकविला तब्बल 448 कोटींचा मिळकत कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात जुनी तब्बल 378 कोटींची कर वसुलीची थकबाकी असून, चालू थकबाकी 70 कोटी रुपये आहे. अशी एकूण 448 कोटी मिळकत कर थकबाकी असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, येत्या तीन महिन्यांत थकबाकी वसूल करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

आयुक्त पी. शिवशंकर यांनी कर थकबाकी वसूल होण्यासाठी पुन्हा ‘अभय योजना’ राबविणार असल्याची माहिती दिली. 1 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान कर भरल्यास दंड आणि शास्तीच्या रकमेमध्ये 60 टक्के सूट देण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीदरम्यान कर भरणाऱया नागरिकांना 50 टक्के सूट, तर एक मार्च ते 31 मार्चदरम्यान कर भरणाऱया नागरिकांना 40 टक्केपर्यंत शास्ती व दंडाच्या रकमेत सूट दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरात दोन लाख 35 हजार मिळकती व प्रॉपर्टी असून, 68 हजार या मिळकती खुल्या जागेच्या आहेत. त्यापैकी दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांमध्ये सुमारे 50च्या वर मिळकतदारांचा समावेश आहे. येणाऱया तीन महिन्यांमध्ये मिळकतकराची थकबाकी मोठय़ा प्रमाणात वसूल केली जाणार आहे. त्यासाठी महिन्यामध्ये सोलापूर शहर क्लिनअप दिसेल, अशी भूमिका पी. शिवशंकर यांनी मांडली.