माझं विमान चुकलं, पैसे देता का? म्हणत तरुणाचा 100 प्रवाशांना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझं विमान चुकलं, मी एका प्रतिष्ठित विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, पैशांची मदत करता का? असं म्हणत एका तरुणाने 100 प्रवाशांना गंडा घातला आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ठगाला अटक करण्यात आली आहे.

या माणसाचं नाव दिनेश कुमार असून तो आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्या विरोधात एका प्रवाशाने तक्रार केली होती. तक्रारीनुसार, प्रवाशाला आरोपीने एका प्रतिष्ठित विद्यापीठाचं ओळखपत्र दाखवलं आणि आपण चंदिगढ येथून आलो असून विशाखापट्टणमला जाणारं विमान सुटल्याचा बहाणा केला.

विशाखापट्टणमला जाणाऱ्या विमानाचं तिकिटही त्याने दाखवलं. त्याची किंमत 15 हजार रुपये इतकी होती. आपल्याकडे नवीन तिकीट काढण्यासाठी फक्त साडे सहा हजार रुपये असल्याचं त्याने प्रवाशाला सांगितलं. आपल्याला थोडे पैसे उधार मिळावेत, ते पैसे विशाखापट्टणमला गेल्यानंतर मी परत करेन, असं आश्वासन त्याने प्रवाशाला दिलं.

गुगल पेच्या माध्यमातून या प्रवाशाने दिनेशच्या खात्यात 9250 रुपये पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने दिनेशकडे पैसे मागितले, पण त्याने दिले नाहीत. वारंवार पैसे मागूनही दिनेशने परत न केल्याने प्रवाशाने पोलिसात तक्रार केली.

प्रवाशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा त्याचा फोटो मिळाला. त्या आधारे दिनेशला अटक करण्यात आली. जेव्हा त्याला अटक करण्यात येत होती, तो आणखी एका प्रवाशाला फसवायच्या बेतात होता. त्याच्या विरोधात अजून पाच तक्रारी पोलिसांना आढळल्या. त्याच्या चौकशीत 100 प्रवाशांना अशाच पद्धतीने गंडा घातल्याचं त्याने कबूल केलं आहे.