
आपलं संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी वेचणाऱया आणि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज रात्री 8.10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगी ममता, जावई आणि हजारो अनाथ बालकांचा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरांतून तीव्र शोक व्यक्त होत आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्यात कर्वेनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर उपचार सुरू होते. या अगोदर त्यांना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीक्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी विदर्भातील वर्धा जिह्यातील जंगल भागातील नवरगाव येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता.
अठराव्या वर्षांपर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्यावेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकडय़ांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱयांना मजुरी, पण शेण काढणाऱयांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढय़ाची जबर किंमत चुकवावी लागली.
गरोदर असलेल्या सिंधुताईंना मुलीला गोठय़ात जन्म द्यावा लागला. नवऱयाने छळ करून घराबाहेर काढल्यानंतर त्यांना गावकऱयांनीही आसरा दिला नाही. माहेरानेही पाठ फिरविली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागण्याची वेळ आली. एकदा जळगाव जिह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. तेथेच अनाथ मुलांची माय बनण्याचा संकल्प त्यांनी केला. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात केली. सिंधुताई यांनी ‘ममता बाल सदन’ यासह बाल निकेतन हडपसर पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, अभिमान बाल भवन वर्धा, गोपिका गाईरक्षण केंद्र वर्धा, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था पुणे या संस्था स्थापन केल्या.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
सिंधुताई यांना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार, सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार. पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’,
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची ‘डी.लिट’.
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणा-या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढय़ांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
अभिनेत्री म्हणून जी काही नावाजले गेले होते ते चित्रपटात सिंधुताई यांची भूमिका साकारल्यामुळेच. माझ्या करिअरमध्ये त्यांचा खूप मोठा काटा आहे. आयुष्यात कधीही हार मानायची नाही, हे त्यांच्याकडून मी शिकले. त्यांचे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे होते. ते चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज त्या या जगात नसल्या तरी माझ्यासाठी त्या कायम जिवंत राहतील. – तेजस्किनी पंडित, अभिनेत्री
ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
अनाथांची मातृदेवता हरपली! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्क आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दीड वर्षापूर्वी सिंधुताईंनी स्बीवत: आपल्याशी दूरध्वनीकर बोलूनविचारपूस केली होती आणि कोविडच्या लढय़ासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, दु:ख कुरकाळत् बसू नवा तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्त्क होतं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे.
























































