
सततचे होणारे वाद आणि वैचारिक मतभेदांमुळे सव्वातीन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा अवघ्या तीन दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एच. के. गणात्रा यांनी मंजूर केला आहे.
परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सव्वातीन वर्षे वेगळे राहत असल्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने मागणी मान्य करत तीन दिवसांत दावा मंजूर केला.
रोहन आणि सीमा (नावे बदलली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. 2015 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. ती पुण्यात व्यावसायिक आहे, तर तो मुंबईत नोकरी करायचा. दोघांना अपत्य नाही. नोव्हेंबर 2018 पासून दोघे वेगळे राहत आहेत. सततचे वाद आणि वैचारिक मतभेदांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी अॅड. विनोद अंबाड, अॅड. प्रणयकुमार लंजिले, अॅड. आकांक्षा दांडगे आण अॅड. अक्षय भालेराव यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, वेगळे राहिल्यानंतर तो कतार देशात नोकरी करतो. घटस्फोटासाठीच्या दाव्यासाठी कतार येथून पुण्यात आला होता. न्यायालयाने घस्फोटाचा अर्ज मंजूर केला. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबवणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत, असे दाम्पत्याचे वकील अॅड. विनोद अंबाड यांनी सांगितले.

























































