
एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांचे निलंबन किंवा बडतर्फी करूनही ते ऐकत नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना चालकांना पुन्हा कामावर येण्याची साद घातली आहे. त्यातच तब्बल 55 हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मिटलेला नसून एसटी महामंडळाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी महामंडळाने जाहिरात दिली असून त्यात सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना नोकरीची ऑफर दिली आहे. या जाहिरातीनुसार वय 62 वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. करार पद्धतीवर नेमणूक करण्यात येणार असून चालकांना दरमहा 20 हजार इतका मेहनताना देण्यात येणार आहे.
तीन दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन
चालकाकडे अवजड वाहक चालक परवाना वैध असणे तसेच पीएसव्ही बॅज असणे गरजेचे आहे. इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या विभागांमध्ये करार पद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. इच्छुक उमेदवारावर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा अशी अटही महामंडळाने ठेवली आहे. एसटीतील सेवानिवृत्तांना आवाहन करताना एसटी महामंडळाने इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती करून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत.
55 हजार कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस
एसटी महामंडळातील संपकरी 55 हजार कर्मचाऱयांना निलंबनाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. हे कर्मचारी हजेरीसाठीही येत नसल्याने त्यांना मिळणारे अर्धे वेतनही दुरापास्त झाले आहे. एसटीने आज 189 कर्मचाऱयांना बडतर्फ केले असून एकूण बडतर्फ कर्मचाऱयांची संख्या 1,333 इतकी झाली आहे. एकूण निलंबित कर्मचाऱयांची संख्या 11,024 इतकी झाली आहे. आतापर्यंत 11,024 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या 55 हजार कर्मचाऱयांना संपकाळातील पगार मिळणार नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.

























































