
अचानक शाळेला कुलूप लावून संस्थाचालकांनी सर्कच पालकांना विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले घेऊन जाण्याची भाषा केल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
देगाव नाका परिसरात थोबडेवस्ती या ठिकाणी ‘रितेश बालक मंदिर’ नावाची शाळा आहे. ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत असून, गुरुवारी नेहमीप्रमाणे पालक विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत गेले असता, शाळेला कुलूप दिसले. याबाबत विचारणा केली असता, संस्थाचालकांनी कुलूप लावले असून, आता विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले घेऊन जा, असे सांगण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेकडो विद्यार्थी, पालक सध्या शाळेसमोर थांबून होते. ही शाळा सोलापुरातील ज्येष्ठ आणि नामवंत विधिज्ञांची असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘आपणास काही माहीत नाही,’ असे उत्तर दिले. शाळेच्या मुख्याध्यापिकांना विचारणा केली असता, संस्थाचालकांनी आपणास ज्या सूचना केल्या, त्या सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सध्या गोंधळ सुरू असून, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


























































