
>> प्रतिक राजूरकर
वर्षागणिक वन्य जीवांच्या हत्येच्या घटना अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. जम्मू-कश्मीरमधील जिवंत अस्वलाला जाळून ठार मारण्याची घटना असो वा स्फोटकांनी भरलेलं अननस खाऊ घालून गर्भवती हत्तीणीला मारण्याची घटना असो यात मानवाने क्रौर्याची परिसीमा गाठलेली दिसून येते. या मानव-वन्य जीव संघर्षात वाघ आणि मानव संघर्षाचीच जास्त चर्चा होते. मात्र हे केवळ वाघांपुरते मर्यादित नाही. गेल्या दहा वर्षांत वाघांची संख्या उत्साहवर्धक असली, तरी दरवर्षी वाघांवर होणारे हल्ले, वाघांचे मृत्यू हा आकडाही निराशाजनक आहे.
जगात सर्वाधिक वाघ हिंदुस्थानात असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या देशात गेल्या काही वर्षांत सातत्याने होत असलेल्या वाघांच्या मृत्यूचा चढता आलेख चिंतेत भर घालणारा आहे. गेल्या दहा वर्षांत वाघांची संख्या उत्साहवर्धक असली, तरी प्रतिवर्षी वाघांवर होणारे हल्ले, वाघांचे मृत्यू निराशाजनक आहेत. 2021 साली तब्बल 126 वाघांचे झालेले मृत्यू त्याची प्रचीती देणारे आहेत. गेल्या दशकात मानव-वन्य जीव संघर्ष शिगेला पोहोचला असून त्या संघर्षात वन्य जीवांवर होणारे हल्ले क्रौर्याची परिसीमा गाठणारे आहेत. केवळ वाघच नाही तर हत्ती, अस्वल, बिबट्या यांच्यावरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले. देशभरात हीच स्थिती असून या हल्ल्यांना नैसर्गिक अधिवासाचीच पार्श्वभूमी आहे. एकीकडे शिकार कमी झाल्याचा वन विभागाकडून दावा केला जात असताना पुन्हा शिकारीच्या घटना डोके वर काढू लागल्या आहेत. हरीण, ससा, घोरपड, रानडुक्कर इत्यादी लहान वन्य जीवांच्या रक्ताचे घोट घेणाऱ्या खवय्यांची भूक अद्याप शमलेली नाही, असे विदारक चित्र मानवाने वन्य जीवांच्या नशिबी लिहून ठेवल्याचे दिसून येते. वन्य जीवांच्या वाढत्या हत्या, हल्ले व मृत्यूचे जुनेच प्रश्न कायम आहेत, त्यावर उपाय अद्यापही मिळालेले नाहीत.
मानव-वन्य जीव संघर्ष हा केवळ वाघ आणि मानवात आहे असा एक मोठा गैरसमज माध्यमात निर्माण केला गेला. वाघाभोवताली असलेले वलय व आर्थिक कारणांमुळे तो संघर्ष वाघापुरता मर्यादित ठेवला गेला आहे. मानवाच्या क्रौर्याला केवळ वाघच नाही, तर प्रत्येक वन्य जीव लक्ष्य ठरल्याच्या घटना घडल्या आहेत. 2012 साली जम्मू-कश्मीर राज्यात एका जिवंत अस्वलाला जाळून ठार मारण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली होती. वाळलेल्या झाडावर स्वतःला वाचवण्यासाठी चढलेल्या अस्वलाला जमलेल्या लोकांनी पेटवून दिल्याची ही धक्कादायक घटना मन हेलावून टाकणारी आहे. हे प्रकार इथेच थांबलेले नाहीत, तर वर्षागणिक वन्य जीवांच्या हत्येच्या घटना अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. 2020 साली केरळ राज्यात अननसात घातलेली स्फोटके खाऊन एका गर्भवती हत्तिणीचा मृत्यू झाला होता. अननस खाताना स्फोट झाल्याने ही क्रूर घटना घडली. हत्तिणीचा मृत्यू व्हावा या हेतूनेच अननसात स्फोटके ठेवण्यात आली होती. हत्तिणीसमवेत तिच्या गर्भातील अर्भकाचासुद्धा स्वाभाविकपणे मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणाचा दुष्परिणाम म्हणून वन्य जीवांचा नागरी भागात होणारा प्रवेश सर्वश्रुतच आहे. बिबट्यासारखे वन्य जीव अनेकदा शहरी भागात येत असतात. देशाच्या अनेक भागांतून बिबट्या शहरात आल्याच्या बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत. जुलै 2020 साली राजस्थान राज्यातील सिकर गावात बिबट्याची काही उपद्रवी नागरिकांनी लाठ्याकाठ्या व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. जून 2020 साली आसाम राज्यातील गुवाहाटी शहरात असाच प्रकार घडला. त्यावर कळस म्हणून काही उपद्रवी नागरिकांनी हत्या केलेल्या बिबट्याच्या मृतदेहाची शहरात मिरवणूक काढण्याचा किळसवाणा प्रकार केल्याची घटना आहे. पुण्यात डिसेंबर 2020 साली आलेला गवा व त्याचा नंतर झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनेने कुठलाही वन्य जीव नैसर्गिक अधिवास शिल्लक नसल्याला पुष्टी देणारा आहे.
एप्रिल 2021 – यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकड्यालगत 2 महिन्यांची गर्भवती असलेल्या चारवर्षीय वाघिणीला गुहेत कोंडून निर्घृणपणे ठार मारण्यात आले. इतकेच नाही तर तिचे दोन पंजे कापून नेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शवविच्छेदनात वाघिणीच्या गर्भात चार अर्भक असल्याची पुष्टी झाली. डिसेंबर 2021 ताडोबानजीक एका वाघिणीच्या जबड्यात रानडुकराला मारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे वाघिणीचा जखमी होऊन मृत्यू झाला. डिसेंबर 2021 साली मानसिंगदेव येथे वाघिणीचा विषप्रयोग करण्यात आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. 2021 संपल्यानंतरसुद्धा वाघांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. 3 जानेवारी 2022 रोजी भद्रावती येथे एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी आहे. वाघांच्या मृत्यूच्या संख्येत सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात असून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे असे दुर्दैवाने नमूद करावे लागेल.
आज महाराष्ट्र राज्यात वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना सर्वाधिक नुकसानभरपाई देण्यात येते, जी देशात सर्वाधिक आहे. ही नुकसानभरपाई 18-20 लाख रुपये करण्याचा शासनाचा मानस आहे. वास्तविक संरक्षित अतिसंरक्षित वनक्षेत्रात प्रवेश बंदी असताना वन्य जीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी का? हा कायदेशीर चर्चेचा विषय आहे. गेल्या सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत वनक्षेत्रालगतच्या विहिरींना झाकणे बसवण्यासाठी अनुदानाची तरतूद केली, परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचे विहिरीत पडण्याचे सत्र कायम आहे. दुर्दैवाने ही योजना कागदावरच दिसली असे म्हणावे लागेल.
वाघ व इतर वन्य जीव हे वनक्षेत्रात तिकीट लावून सफारीचा आनंद घेऊन बघण्यापुरते मर्यादित आहेत असेच वरील घटना दर्शवितात. वन्य जीव हे मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, आसामसारख्या राज्यांचे आर्थिक स्रोत आहेत. देशभरात वन्य जीवांमुळे अनेक कुटुंबांना रोजगार प्राप्त झाला आहे. अगदी पुराणकाळात कथेत देवीदेवतांचे वाहन म्हणून वन्य जीवांचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने स्थान देण्यात आले. मानवाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सुबत्ता उपलब्ध करून देणाऱ्या वन्य जीवांच्या पदरी असे मृत्यू यावेत हे कुठलाच धर्म स्वीकारणार नाही, परंतु आजही महामार्ग, रेल्वेमार्ग, विद्युतप्रवाह, शिकार हे वन्य जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरताहेत. विद्युत प्रवाहामुळे होणारे वन्य जीवांचे मृत्यू हा तर एक स्वतंत्र विषय आहे. वन्य जीव तेच आहेत, त्यांचे प्रश्नही तेच आहेत, नाही ते फक्त या संघर्षावरील उत्तर!


























































