
नुक्कड कॅफे …छत्तीसगडच्या रायपूर शहरातील एक अनोखे आणि चर्चेत असलेले कॅफे… केवळ तरुणाई नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पांचे हे ठिकाण. तिथे पुस्तके वाचली जातात. परिसंवादही होतात. त्यापेक्षा नुक्कड कॅफेचे खास वैशिष्टय़ सांगायचे तर तिथला कर्मचारी वर्ग बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही. मुख्य प्रवाहात ज्यांना काम मिळू शकत नाही अशा दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांना या कॅफेत काम दिले जाते. म्हणूनच या कॅफेचे नाव देशभरात झाले आहे.
नुक्कड कॅफेत काम करणारे दीनदयाल साहू बोलू शकत नाहीत, मात्र ग्राहकांची भाषा ते सहजतेने समजू शकतात. कमी उंची असलेले मनीष कुमार मागील तीन वर्षांपासून काम करत असून सांकेतिक भाषा सहजतेने समजून घेतात. ज्या ग्राहकांना सांकेतिक भाषा समजत नाही ते कागदावर ऑर्डर लिहून देतात किंवा कर्मचाऱयाला बोलवायचे असेल तर मोबाईलची फ्लॅश लाइट सुरू करून बोलावतात.
इंजिनीयर प्रियंक पटेल यांनी दिल्लीची नोकरी सोडून 2013 मध्ये रायपूर येथे नुक्कड कॅफे सुरू केले. हळूहळू कॅफेची संकल्पना ग्राहकांना आवडू लागली. आता कॅफेचे चार मालक आहेत. कॅफेत भिंतींवर कविता आणि पेंटिंग दिसतात. एक वाचनालयदेखील आहे. तिथे बसून ग्राहक वाचन करू शकतात. पुस्तकांची देवघेव करू शकतात. नुक्कड कॅफेत आदिवासी कला, संस्कृतीच्या प्रसाराचे काम केले जाते. कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या आगळ्यावेगळ्या कॅफेत 200 हून अधिक जणांना रोजगार मिळाला आहे.
























































