
गणेशोत्सव हा मुंबई-महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणाऱया प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे पीओपीच्या मूर्तींवर सरसकट बंदी न घालता पीओपी आणि त्यामधील घातक रसायनांना पर्याय द्या, अशी मागणी आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 मे 2020 रोजी जारी केलेली मूर्ती विसर्जन नियमावलीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकान्वये 31 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आज पालिका प्रशासनाची गणेशोत्सव मंडळांसोबत ऑनलाइन बैठक पार पडली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, गटनेते, अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, समन्वय समिती यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांनी आपली मते मांडली. शिवाय याबाबतचा निर्णय प्रशासनाने लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी केली.
पेंद्रीय समितीचा प्रलंबित अहवाल विचारात घ्या!
- यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. सदर समितीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे . त्याबाबत केंद्र सरकारकडे विचारणा करण्यात यावी अशी मागणी यावेळी गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली.
- या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता पीओपीच्या पर्यायाबाबत पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करावा, पर्यावरणाचा ऱहास होणार नाही याची काळजी घेऊन उत्सवाची परंपरा राखण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा असे मत महापौर, गटनेत्यांनी मांडले.
पालिका विधी खात्याचा सल्ला घेणार
पालिकेच्या विधी खात्यामार्फत कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. गणेशोत्सव पारंपरिक आणि मोठा उत्सव असल्यामुळे पीओपीला पर्याय देण्यासंदर्भात नीरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांनी त्यांचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. शिवाय बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचा सकारात्मक विचार करून अहवाल सादर करावा असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे म्हणतात…
पी.ओ.पी.च्या मूर्तीवर बंदी असेल तर पी.ओ.पी.ला पर्याय सुचवावा. कारण पीओपीच्या मूर्ती या हलक्या असतात.
मातीच्या मूर्ती बनविण्याकरिता मोठी जागा लागते. मातीच्या मूर्ती सुकण्याकरिता जास्त कालावधी आवश्यक असतो.
या उत्सवावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो याचाही विचार व्हावा. त्यामुळे पी.ओ.पी.वर सरसकट बंदी लादण्यात येऊ नये.
























































