बायकोच्या चेहऱ्याला केक लावण्याची चूक पडली महागात, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दिला घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात लग्नाबाबत अनेक आश्चर्यकारक घटना घडत असतात. या व्हायरल झालेल्या घटना काही वेळा गंमतीशीर असतात, तर काही वेळा पती-पत्नीकडूनच अजाणतेपणी झालेल्या छोट्याशा चुकीमुळे त्याला गंभीर स्वरुप येते आणि त्याचा भुर्दंड त्या दोघांनाच सहन करावा लागतो. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. येथील एका नववधूने, नवरा इच्छेविरुद्ध वागल्यामुळे त्याला दुसऱ्याच दिवशी घटस्फोट दिला आहे.

लग्नसोहळा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वधू-वराने आपल्या नातेवाईकांकरिता एका समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात केक कापण्यात येणार होता. यावेळी सर्व पै-पाहुण्यांसमोर कोणीही तिच्या चेहऱ्याला केक लावू नये, असे तिला वाटत होते. याविषयी तिने तिच्या पतीला सूचनाही दिली होती. पण प्रत्यक्षात समारंभात केक कापण्याची वेळ आली तेव्हा नवरा तिची ही सूचना विसरून गेला. केक कापल्यानंतर त्याने तिचे डोके धरून तिच्या चेहऱ्याला केक फासला. ती त्याला असे करण्यापासून थांबवत होती, पण त्याने तिचे काहीही ऐकले नाही. तो तिच्या चेहऱ्याला केक लावतच राहिला. यामुळे नववधूला प्रचंड राग आला ज्यामुळे वधू-वरामध्ये वादावादी झाली.

वराने वधूच्या इच्छेविरुद्ध कृत्य केल्याने हा प्रकार घडला. त्यानंतर हे प्रकरण इतके पुढे गेले की, नववधूने टोकाचे पाऊल उचलले. भर समारंभात पतीने चेहऱ्याला केक लावणे हे अत्यंत अपमानास्पद वाटले. त्यामुळे लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिने पतीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आणि वराला घटस्फोट दिला. वधूने हा प्रसंग सोशल मिडियावर शेअर केला आहे.