शासकीय नोकरभरती आता टीसीएस-एमकेसीएलच्या माध्यमातून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या विविध विभागांत होणाऱया नोकर भरतीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या कंपन्यांच्या पॅनेलला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. आता शासकीय विभागातील पद भरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचा आरोग्य विभाग, म्हाडामधील नोकर भरतीच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पेपरफुटीच्या मुद्दय़ावरून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिकेशनातही याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत यापुढे पदभरतीसाठी घेण्यात येणाऱया परीक्षांसाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएलच्या माध्यमातून या परीक्षा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.

हिवाळी अधिकेशनात घोषणा

शासकीय खात्यातील भरती ही टीसीएस, एमकेसीएल व आयबीपीएससारख्या प्रतिष्ठत व अनुभवी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिकेशनातही केली होती. अखेर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात नसणाऱया राज्यातील विविध पदांच्या भरतीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कंपन्यांच्या पॅनेलला स्थगिती दिली आहे. आता या परीक्षांसाठी यापुढे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या कंपन्यांची निवड करण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.