
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्ज प्रकरणात अनेक घोटाळे उघड झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अचानक रिझर्व्ह बँकेच्या नऊ अधिकाऱ्यांचे पथक बँकेमध्ये दाखल झाले असून, त्यांनी बँकेच्या परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या संदर्भामध्ये अनेक घोटाळे उघड झालेले आहेत. या घोटाळ्याची सध्या चौकशी विविध माध्यमांतून सुरू आहे, तर काही प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत. नगर अर्बन बँकेसंदर्भात आरबीआयकडे तसेच केंद्र सरकारकडे विविध प्रकारच्या तक्रारी झाल्यामुळे बँकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. मागील महिन्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली व नव्याने संचालक मंडळ कारभार पाहत आहे. नव्या संचालक मंडळामध्ये अनेक माजी संचालकांचाही समावेश आहे.
बँकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या बँकेवर प्रशासक नेमण्यात आलेला होता. त्यावेळी अनेक बंधने या बँकेवर घालण्यात आली होती. यामध्ये आर्थिक बंधनेसुद्धा मोठय़ा प्रमाणावर आहेत, तसेच बँकेने दररोजचा ताळेबंद हा आरबीआयला द्यावा, असे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. सध्या सर्वसामान्य खातेदारांना या बँकेतून पैसे काढणेदेखील कठीण झालेले आहे. निर्बंध असल्यामुळे अनेकांचे पैसे अडकून पडले आहेत. या सर्व प्रकारामुळे बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शंभर कोटींहून अधिक रुपयांच्या कर्ज प्रकरणांचा घोळ उजेडात आलेला आहे. पुणे, नगर याठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे या माध्यमातून दाखल झालेले आहेत. त्याची सध्या चौकशी सुरू आहेत, तर काही न्यायप्रविष्ट आहेत. नगर अर्बन बँकेची सद्यस्थिती पाहता या बँकेवरील निर्बंध दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे खातेदार चिंताग्रस्त आहेत. त्यातच आज आरबीआयचे अनेक अधिकारी बँकेमध्ये दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. सकाळपासून अंतर्गत बैठका घेण्यास सुरुवात झालेली आहे. बँकेची सद्यस्थिती काय आहे व नेमक्या ठेवी किती आहेत, तसेच कर्ज प्रकरणांमध्ये किती पैसे येणे बाकी आहे, यांसह विविध प्रकारची माहिती घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.






























































