शिरोळ तालुक्यात दिवस रात्र मातीची लूट सुरूच, कृष्णाकाठ धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठावरील मळीची माती सुपीक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीटभट्टी कामासाठी वापरली जात आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील असलेल्या गावांना पुराचा धोका व मळीघाट नामशेष होत आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील औरवाड, बुबनाळ, शेडशाळ आदीसह परिसरातील भागात आहे.

महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे नियमबाह्य मातीचे उत्खनन सुरू आहे. नदीकाठी मातीचे उत्खनन रात्रंदिवस सुरू असल्यामुळे नदीचे संवर्धन टिकविण्यासाठी उपाययोजना न करता राजरोसपणे औरवाड, बुबनाळ, शेडशाळसह परिसरात नियमबाह्य माती उत्खनन सुरू आहे. परवान्यापेक्षा अधिक बेकायदेशीरपणे उत्खनन केले जात आहे. कृष्णा नदीकाठावरील लाल माती उपसा करून सांगली जिल्ह्यातील अंकली, हरिपूर, इनामधामणी, बामणी, टाकळी, मिरज, बोलवाड या ठिकाणी साठवणूकही केली जाते, तर शिरोळ तालुक्यातील गावात अनेक जणांनी माती उत्खनन करून साठाही केला आहे.

पर्यावरणाला हानी पोहोचवून होत असलेल्या नियमबाह्य माती उपशाला महसूल विभागाने वेळीच आवर घालणे गरजेचे होते. सध्याच्या स्थितीत अगदी नदीपात्रालगत माती उत्खनन केल्याने नदीच्या काठावरील संवर्धन धोक्यात आले आहे. एकीकडे राज्य शासन पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धनासाठी विविध योजना राबवीत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या माती उत्खननामुळे कृष्णाकाठ काळाआड जाण्याची शक्यता आहे. औरवाड, बुबनाळ, शेडशाळ कवठेगुलंद आणि परिसरात माती उत्खनामुळे मळीच्या शेती नामशेष होत चालली आहे. त्यामुळे नदीचे पात्र मोठे झाले असून, अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी थेट गावात येणार आहे.

आजच्या स्थितीला शेतकऱ्यांना कृष्णाकाठ शोधावा लागणार आहे. त्यामुळे महसूल विभागाने एक पाऊल पुढे येऊन माती उत्खननाची नियमावली देणे गरजेचे आहे. काय आहे जबाबदारी माती उत्खनन करीत असताना नदीपात्राच्या परिसरातील वनस्पती व प्राणी यांना धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. उत्खननाला ठेका दिलेल्या एकूण क्षेत्राच्या समप्रमाणात इतक्या क्षेत्रावर नदीकाठी अथवा अन्य ठिकाणी वृक्षलागवड करून त्यांची माहिती ग्रामपंचायतीला देण्याची आहे.

तसेच वृक्षलागवड करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याचा आहे. सार्वजनिक पाणवठा, पाणीपुरवठा व्यवस्था असलेल्या ठिकाणापासून 100 मीटर अथवा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा करताना निश्चित करेल तेवढ्या अंतरापलीकडे उत्खनन करायचे आहे. शासनाचा महसूल भरतो, मग माती उपसणारच, अशी भूमिका घेत हजारो ब्रास मातीचे उत्खनन परिसरात सुरू आहे. यातूनच वीटभट्टीमालकांना मोठा फायदा होताना दिसत आहे़ दरम्यान, प्रशासनाने पाहणी करून मातीचे उत्खनन किती केले आहे यावर जुजबी कारवाई केल्याचे दिसून येते.