
नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱयांनी अधिक प्राधान्य दिले आहे. यंदा आतापर्यंत सुमारे एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 29 हजार 710 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांतील नगर जिल्ह्यातील ही विक्रमी लागवड आहे.
नगर जिल्ह्यात साधारण सात ते आठ वर्षांपासून कांद्याचे उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन वर्षांत अतिपाऊस, रोगाचा प्रादुर्भाव, दरात चढ-उतार आणि कोरोना अशा अनेक संकटांतून कांद्याचे नुकसान झाले. तरीही नगदी पीक म्हणून अलीकडच्या काळात कांदा उत्पादनाला नगर जिल्ह्यात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. मात्र, यंदा काही महिन्यांपासून कांद्याचे दर अडीच ते तीन हजारांवर स्थिर आहे.
यंदा पाण्याची उपलब्धता बऱयापैकी असल्याने आतापर्यंत यंदा कांद्याची एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, हा आकडा पावणेदोन लाखाच्या जवळपास जाण्याची अंदाज व्यक्त केली जात आहे. पारनेरसह अन्य तालुक्यांत यंदा कांदा लागवड अधिक आहे. जिल्ह्यात अलीकडे कांद्याची सर्वाधिक लागवड आहे.
बियाणे फसवणुकीकडे दुर्लक्ष
नगर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात बियाण्यांत फसवणुकीचे अनेक प्रकार घडले. यंदाही वाटाणा, सोयाबीन, कांद्याच्या बियाण्यांत फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या. कर्जतमध्ये डाळिंबावर फवारणी केल्या जाणाऱया कीटकनाशकात फसवणूक झाली. त्याचा आर्थिक फटका शेतकऱयांना सोसावा लागला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण यांच्याकडून कार्यवाही होणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष केले.
तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टरमध्ये) ः नगर – 25,821, पारनेर – 29,710, श्रीगोंदा – 11,141, कर्जत – 17,186, जामखेड – 2410, शेवगाव – 3859, पाथर्डी – 11,652, नेवासा – 8458, राहुरी – 9761, संगमनेर – 8,169, अकोले – 509, कोपरगाव – 10,354, श्रीरामपूर – 9107, राहाता – 3136.





























































