
जगभर बहुरूपी ओमायक्रोनची रुग्ण संख्या वाढत आहे. या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना सावध केले आहे. कोरोना संपणार नाही. भविष्यात याचे नवनवे व्हेरिएंट येतील. ओमायक्रोनला शेवटचा व्हेरिएंट समजणे धोकादायक आहे. सावधगिरी कायम ठेवली पाहिजे, असा इशारा तांत्रिक विभाग प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी दिला आहे.
कोरोना विषाणू अजूनही सक्रीय होऊन रूपे बदलत आहे. आपल्याला त्यानुसारच बदलण्याची गरज आहे. सध्याच्या तिसऱया लाटेला निमंत्रण देणाऱया ओमायक्रोनच्या बरोबरीने कोरोना संपणार नाही. जर लोकांना आवश्यक आरोग्य सुविधा मिळत नसतील तर मोठय़ा प्रमाणावर लोक गंभीर आजारी पडतील आणि मृत्यूदेखील वाढतील. हे संकट आम्हाला रोखायचे आहे, असे केरखोव्ह यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
केरखोव्ह यांनी मांडलेली मते
- जगातील तीन अब्ज लोकांनी अद्याप लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. लसीकरणाच्या बाबतीत काही मोजकेच देश पुढे आहेत.
- कोरोनाच्या जागतिक समस्येवर जागतिक पातळीवर उपाय राबवूनच मात करता येईल.
- कमी प्रतिकारशक्ती, वयस्कर लोक यांच्यासह लस न घेणाऱयांना कोरोनाचा जास्त धोका आहे.
- लसीकरण कोरोना संसर्गापासून बचावाचा खात्रीशीर उपाय आहे. मात्र तोही परिपूर्ण नाही. लोकांना तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, हात-तोंड धुणे तसेच इतर काळजी घ्यावीच लागेल.
जग नाजूक वळणावर उभे
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनीही ओमायक्रोनच्या उद्रेकावर सोमवारी चिंता व्यक्त केली. कोरोना महामारी तिसऱया वर्षात प्रवेश करतेय. आपण एका नाजूक वळणावर उभे आहोत, असे मत घेब्रेयेसस यांनी नोंदवले.
























































