
राजापुरात तालुक्यातील केळवडे येथे डोक्यात छरे लागून दीपक गुरव यांचा शनिवारी सिंधुदुर्ग येथे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांची आता बेकायदेशीर बंदुका बाळगणार्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम उभारली आहे. कारवाईच्या भीतीने येथील अनेकांनी आपल्या ताब्यातील बेकायदेशीर बंदुका जंगलात लपवल्या होत्या. मात्र पोलिसांनी चौकशी करत आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे विनापरवाना ठासणीच्या 4 बंदुका आढळल्या आहेत.
कोदवली तरवळवाडी येथे आणखी एका व्यक्तीकडे बंदूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी कोदवली तरळवाडी येथील एकाला ताब्यात घेतले. त्याने काजूच्या सिमेंटच्या पाईपमध्ये लपवून ठेवलेल्या दोन बेकायदेशीर ठासणीच्या बंदुकांसह 10 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त केला. संतोष अनु मांडवे (38, कोदवली, तरळवाडी, राजापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार कमलाकर शंकर पाटील यांनी पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार संतोष याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसर्या एकाला केळवडे, गुरववाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने आपल्या ताब्यातील बेकायदेशीर सिंगल ठासणीची बंदूक आंब्याच्या कलमांच्या झाडावर लपवून ठेवली होती. तेथून पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून त्याच्याकडे एक सिंगल ठासणी बंदूक व एक एअरगन असा एकूण 6 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करत त्याला ताब्यात घेतले आहे. नितेश सुरेश गुरव (29, केळवडे, गुरववाडी, राजापूर) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संतोष सावंत यांनी पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार नितेश याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































