पर्यटन – व्हॅलेंटाइन डेस्टिनेशन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सिद्धी शिंदे

प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण सगळ्यांचं सेम? अजिबात नाही! काहींचं प्रेम फिल्मी, काहींचं साहसी, काहींचं खादाड तर काहींचं निवांत. व्यक्ती तशा वल्ली व तशाच प्रेम करायच्या पद्धती असतात. अर्थात अशा पार्टनर्सना प्रेमाची कबुली देण्यासाठी काहीतरी हटके केलं तर ते नेहमी लक्षात राहील. यंदा तुमच्या पार्टनरला व्हॅलेंटाईन निमित्त 3 मॅजिकल शब्द सांगण्याचा विचार करत असाल तर आताच तयारीला लागा. खर्चाची गणितं मांडायला बसण्याआधी थांबा, आम्ही तुम्हाला अशी काही हटके ठिकाणं सुचवणार आहोत जिथे कमी खर्चात तुम्ही आयुष्यातील एक सुंदर क्षण कायमच्या आठवणीत रूपांतरित करू शकाल.

शेवटी अभिनेता शाहरुख खान यांनी सांगितल्याप्रमाणे ‘हम प्यार भी एक ही बार करते है और शादी भी!’ त्यामुळे यंदा 14 फेब्रुवारीनिमित्त प्रेमाची कबुली किंवा थेट लग्नासाठी मागणी घालू इच्छित असाल तर या मुंबई, पुण्यापासून जवळच असणाऱया या ठिकाणांचा नक्की विचार करू शकता.

खाऊगल्ली

व्हॅलेंटाईन सोमवारी आल्याने सहल शक्य नसेल तर निदान एक डेट तर नक्कीच तुम्हीही प्लॅन करू शकता. महाराष्ट्रात म्हणाल त्या शहरात विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध खाऊगल्ली आहेत. मुंबईतच नव्हे तर पुण्यात, नाशिक, नागपूरमधील खाऊगल्लीसुद्धा अलीकडे अनेक खवय्यांचे लक्ष वेधत आहेत. विचार करा, तुमचा पार्टनर त्याचा आवडीचा पदार्थ खात आनंदी असताना प्रेमाची कबुली दिल्यास त्यांचा आनंद किती पटीने वाढवता येईल. आणि मुख्य म्हणजे महागडय़ा डिनर डेटपेक्षा हा पर्याय अधिक आपलासा वाटेल.

पाणजू बेट

नायगाव-भाईंदर दरम्यान, वसई शहरापासून 10 किमी अंतरावर हे बेट आहे. नायगाव जेटीवरून बोटीने सात मिनिटांत पोहोचता येते. आपल्या पार्टनरला विना गर्दीच्या, एखाद्या शांत निवांत ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात प्रेमाची कबुली देण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. आपली इच्छा असल्यास आपण या गावातील अनेक सुंदर मंदिरे, स्थानिकांनी कलाकुसरीतून सजवलेली घरे, मिठागरे हे सर्व पाहण्यासाठी जाऊ शकता. अन्यथा निव्वळ गर्दीपासून दूर जायचे असेल आणि कमी बजेटमध्ये काही निवांत क्षण घालवायचे असतील तरीही हे बेट सुंदर आहे.

कामशेत पॅराग्लायडिंग

तुमच्या पार्टनरला साहसी गोष्टी करणे आवडत असल्यास महाराष्ट्रातील पॅराग्लायडिंग राजधानी कामशेत नक्की भेट देण्यासारखे ठिकाण आहे. कामशेतजवळील शिंदे वाडी येथे हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईनच्या वीकेंडसाठी ही कमी दरात एक रोमँटिक सहल नक्की विचारात घ्या. कार्ला लेणी, तुंग किल्ला, पावना धरण ही ठिकाणेसुद्धा इथून जवळ आहेत.

गडावर ट्रेक

अलीकडे अनेक कहाण्या आम्ही ट्रेकला जाताना भेटलो अशा सुरू होतात. योगायोगाने तुमचेही असे काही असेल तर तुमच्या पार्टनरला व्हॅलेंटाईननिमित्त एखाद्या ट्रेक दरम्यानच प्रेमाची कबुली देण्याचा विचार करू शकता. खरंतर महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावरून दिसणारा नजारा हा थक्क करणारा आणि मोहकच आहे, पण त्यातही निवड करायची झाल्यास हरिश्चंद्रगड, विसापूर किंवा लोहगड, अलिबागवरून जवळचा कुलाबा किल्ला हे पर्याय अंतर व वातावरणाच्या दृष्टीने सध्या सोयीचे ठरतील.

फ्लेमिंगो अभयारण्य

फेब्रुवारीच्या मध्यापासून ठाणे-वाशी खाडीवर फ्लेमिंगोचे आगमन होते, पाण्याच्या लाटांवरून उडणाऱया गुलाबी राजहंसांचा हा नजारा अगदी नेत्रसुखद असतो. महाराष्ट्रातील हे दुसरे सागरी अभयारण्य आहे. याठिकाणी पक्षी निरीक्षण आणि पर्यटकांना खाडीत सैर करण्यासाठी ‘फ्लेमिंगो नौका सवारी’ उपलब्ध आहे. विचार करा, तुमच्या निसर्गप्रेमी पार्टनरला तब्बल 200 प्रजातींच्या पक्ष्यांच्या आणि समुद्राच्या साक्षीने प्रेमाची कबुली देणे किती रोमँटिक ठरेल.