
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाणांवर तसेच देशी दारू विक्री ठिकाणांवर सामूहिक छापे टाकून मोहिमेत एकूण 14 गुन्हे नोंद करून 6 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा, कडजी तांडा व उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांडा या परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या राहुल विलास चोपडे (वय 43, रा. सोलापूर), रामू भिलू चव्हाण (वय 42, रा. गुळवंची तांडा, ता. उत्तर सोलापूर), राजेंद्र भीमराव राठोड (वय 42, रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) या आरोपींना गुह्याच्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली. या मोहिमेत गावठी दारू निर्मितीसाठी आवश्यक 21 हजार 250 लिटर गूळमिश्रित रसायन, 100 लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण 4 लाख 87 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत निरीक्षक ब विभाग एस. एम. मस्करे, निरीक्षक ए. आय. खतीब, दुय्यम निरीक्षक एस. ए. पाटील, एस. डी. झगडे, जी. एस. उंडे, जी. एच. हजारे व इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस एस. एस. कदम व सहायक दुय्यम निरीक्षक पवार, जवान कर्मचारी पाटील, माळी, काळे व वाहनचालक नवले यांच्या पथकाने देशी दारू वाहतूक व विक्रीवर कारवाई करून एकूण 5 गुन्हे नोंद करून 4 आरोपींना अटक केली आहे. मुमताज शकील तांबोळी, नवनाथ अशोक काळे, बाळू गोरख काळे, सातप्पा अरुण शिंदे व राजाराम रावसाहेब कलेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईत 2 दुचाकी, 155 लिटर हातभट्टी दारू व 12.24 लिटर देशी दारू असा एकूण 1 लाख 72 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहोळ तालुक्यातील साकळेश्वर येथे छापा टाकून शंकर गोविंद पवार (वय 49) याला हातभट्टी दारू विकताना अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 1 हजार 450 रुपये किमतीची 25 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे.


























































