
- शिरीष कणेकर
आता हे सांगायला हरकत नाही. नाऊ धिस कॅन बी टोल्ड.
माझ्या दिवाणखान्यात बसून लता मंगेशकरला माझ्या फ्लॅटच्या आकाराचा अंदाज आला. अंदाजापाठोपाठ कणव आली असावी. ऑफ्टर ऑल मी गानकोकिळेच्या परिवारातला होतो.
‘शिरीष, तुम्हाला मोठी जागा हवीय का?’ एखादी मंजुळ लकेर छेडावी त्या मंजुळपणे तिनं विचारलं.
मी गोंधळून गेलो. या प्रश्नाची लताकडून मुळीच अपेक्षा नव्हती. शंकर-जयकिशन, मदन मोहन व नौशाद सोडून एकाएकी माझ्या खुराडय़ासमान जागेनं तिचं लक्ष कसं काय वेधलं असावं? हा बदसूर तिला कुठं भेटला? मूर्तिमंत सुरांच्या मूर्तीनं हा बदसूर कसा समजून घेतला? मग माझ्याच मनानं उत्तर दिलं – प्रेम, आपुलकी, ममत्व!
माझं गोंधळणं, गडबडणं, घुटमळणं संपतच नव्हतं. शेवटी ते संपलं तेव्हा मी काही बोलणार तो तीच म्हणाली, ‘मी मोठी जागा तुम्हाला देऊ शकते. मी बोलीन कोणाशी तरी.’
‘नको-नको.’ मी कसं तरी बोललो. बापरे, नको. मला आयुष्यभर लताच्या ऋणात राहायचं होतं, पण असल्या ऋणात नाही. मला तिच्या गाण्यांच्या सुखात डुंबायला होतं, तिच्या ऐहिक उपकारांच्या ओझ्याखाली चिरडून जायचं नव्हतं. लता माझी मर्मबंधातली ठेव होती, माझ्या सुखाचा ठेवा होती. माझ्या जखमी मनाचं मलम होती. फार काय, माझ्या जगण्याचं कारण होती. जगाला विसरायला लावण्याची ताकद त्या नाजूक गळ्यात होती. मी तिला माझ्या व्यवहारिक जीवनातील धनको करू? ‘एवढी लतानं जागा मिळवून दिली’ या अनुधारित शब्दशरांनी आयुष्यभर माझा वेध घेतला असता. तिला देव्हाऱयातच राहू द्या. माणसांच्या गर्दीत खेचू नका. तिची तळमळ मला कळत होती. त्याबद्दल मी नतमस्तकही होतो, पण नको ना दीदी, नको. तुम्ही फक्त गा. मी वेलीसारखा डोलीन. म्हणा ‘छुन छुन छुन बाजे पायल मोरी’ किंवा म्हणा ‘बदली तेरी नजर, तो नजारे बदल गये’ किंवा म्हणा, ‘तुम्हारे संग मैं भी चलुंगी पिया’ किंवा म्हणा ‘तीर खाते जायेंगे’ किंवा म्हणा ‘दर्दे मुहोब्बत आ तुझको’ किंवा म्हणा ‘मेरी उस्फत सोयी है यहां’ किंवा म्हणा ‘अल्ला तेरो नाम…’
अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये मी ज्या घरी उतरलो होतो त्या घरच्या बाईनं मला विव्हळून विव्हळून सांगितलं, – अहो, काय सांगू तुम्हाला? लताचा इथे कार्यक्रम झाला होता. माझी एक जवळची मैत्रीण उपवास होता म्हणून लतासाठी खास तुपातली साबुदाण्याची खिचडी घेऊन गेली होती. ‘मी असलं काही खात नसते’ असं म्हणून लतानं हातातली खिचडीची बशी भिरकावून दिली. माझ्या मैत्रिणीला इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू. सांगतानादेखील ती रडत होती.’
‘मला हे खरं वाटत नाही, लतानं अन्न फेकलं? इंपॉसिबल. तरी पण मी लताला विचारेन.’ मी म्हणालो.
मुंबईला परतल्यावर मी लताच्या कानावर घातलं.
‘काय?’ ती (सुरात) ओरडली, ‘मी अन्नाचा अपमान केला? शक्य तरी आहे का हे? तुम्हाला खरं वाटतंय?’
मी त्या बाईंना फोनवर सांगितलं आणि म्हणालो, ‘माफ करा, पण तुमच्या रडून सांगणाऱया मैत्रिणीपेक्षा माझा न रडता सांगणाऱया लतावर जास्त विश्वास आहे. लता अन्नाला देव मानते. तुमच्या मैत्रिणीला डोळे पुसायला सांगा.’
लताच्या शेवटच्या आजारपणात तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माझ्या मुलीनं तिला अमेरिकेतून फोन केला होता. श्वेता म्हटल्यावर तिला पटकन कळलं नाही.
‘अगं, मी चार-पाच श्वेता ओळखते. तू कोण?’ लतानं विचारलं.
श्वेतानं तिला ओळख सांगितली.
‘तू होय?’ लता चित्कारली. ‘कशी आहेस? काय चाललंय?’
‘माझी जाऊ द्या हो. तुम्ही कशा आहात? तुम्हाला कधी तरी असा फोन केलेला चालेल का?’
‘केव्हाही कर. परवानगी कसली मागतेस? मस्त गप्पा मारू या.’ आजारी लता प्रसन्नपणे म्हणाली.
माझ्या मुलीला हे मला सांगतानाही रडू कोसळलं होतं. लग्नातही ती लताला मिठी मारून रडली होती.
मी मुलीच्या लग्नाला आल्याबद्दल लताचे आभार मानत असताना ती म्हणाली, ‘अहो, असं काय करता? लहानपणापासून ती मला ‘फ्रेंड’ म्हणत आलीय, मग ‘फ्रेंड’च्या लग्नाला जायला नको?’
या लतानं साबुदाण्याच्या खिचडीची डिश भिरकावून दिली? म्हणजे एकटय़ा माझ्याशी ती निरुपा रॉय व बाकी सगळय़ांशी प्रेम चोप्रा होती की काय? लताला ही तुलना खूप आवडली असती. खळखळून हसली असती.
अजूनही मी त्याच घरात राहतो. या घराच्या भिंतींनी माझ्या बरोबरीनं माझ्या इतकीच लता ऐकल्येय. मला एखाद्या गाण्याचा शब्द आठवला नाही तर त्या नक्की सांगतील.
मला आतून खोल कुठेतरी वाटत आलंय की माझ्या अंतिम क्षणी यातली एखादी भिंत गायला लागेल-
वो तो चले गये ऐ दिल
याद से उनकी प्यार कर
जीने में क्या मजा रहा
मौत का इंतजार कर

























































