बारच्या परवान्यासाठी वय लपवून खोटी कागदपत्रे दिली; वानखेडेंविरोधात ठाण्यात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या क्रुझवरील कथित रेव्ह पार्टी कारवाईनंतर अडचणीत आलेले एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांचा पाय पुरता खोलात गेला आहे. त्यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द झाल्यानंतर आता या बारच्या परवान्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी वानखेडे यांच्याविरोधात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन बार आणि रेस्तराँचा परवाना घेतल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावे सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना होता. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार हा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी जारी करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी समीर वानखेडे हे सज्ञान नव्हते असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री यांनी कागदोपत्री पुराव्यासह केला होता. या प्रकरणातील तथ्य समोर आल्यानंतर या बारचा परवाना ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी रद्द केला होता. आता याच सद्गुरू बार आणि  रेस्तराँसाठी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी समीर वानखडे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.