शाब्बास पठ्ठय़ांनो! ब्रिटनमधील वादळात एअर इंडियाच्या विमानांचे कुशल लॅण्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनला सध्या युनिस वादळाचा तडाखा बसला आहे. ब्रिटन आणि उत्तर फ्रान्समध्ये 1987 साली आलेल्या वादळानंतरचे हे सर्वात तीव्र वादळ असल्याचे समजते. वादळामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. अशातच हिथ्रो विमानतळावर तुफान वादळात हिंदुस्थानी पायलटनी एअर इंडियाच्या विमानाचे अतिशय कुशलतेने लॅण्डिंग केले. हिंदुस्थानी पायलटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोन्ही पायलटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वादळामध्ये हिथ्रो विमानतळावर एक नव्हे तर दोन एअर इंडियाच्या विमानांचे यशस्वी लॅण्डिंग झाले आहे. एक विमान हैदराबादहून आले होते, तर दुसरे गोव्याहून आले होते. हिंदुस्थानी पायलटनी पहिल्याच प्रयत्नात ते विमानतळावर सुखरूप उतरवले. कमांडर कॅप्टन अंचित भारद्वाज आणि आदित्य राव अशी दोघा पायलटची नावे आहेत.

ब्रिटिश एअरवेज आणि कतार एअरवेजच्या विमानांना लॅण्डिंग करताना खूप अडचणी येत होत्या, पण आमच्या पायलटनी अतिशय अचूक आणि उत्कृष्ट लॅण्डिंग कौशल्य दाखवले. ते सर्व उच्च प्रशिक्षित आहेत, असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱयाने सांगितले.