पसरणी घाटात पर्यटकांची खासगी बस जळून खाक, सुदैवाने जिवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी बसने पेट घेतल्याची घटना पसरणी घाटातील नागेवाडी फाटय़ाजवळ रविवारी दुपारी घडली. या घटनेत प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पसरणी घाटात मोठय़ा प्रमाणात वाहतूक होती. गोरेगाव तालुक्यातील माणगाव येथील खासगी कंपनीतील कर्मचाऱयांची सहल सपकाळ ट्रव्हल्सच्या बसने पंढरपूरला गेली होती. तेथून रविवारी सकाळी ते मांढरदेवमार्गे महाबळेश्वरला निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास पसरणी घाटात बस आली. त्यावेळी शेजारून जाणाऱया वाहनचालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले. चालक रवींद्र कोळसकर (वय 47, रा. माणगाव, ता. गोरेगाव, जि. रायगड) यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या बसमध्ये लहान मुलांसह 39 प्रवासी होते.

या घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वाई, पाचगणी पालिकांच्या अग्निशमन बंबांना पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयत्न केले; परंतु संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान, या घटनेमुळे वाई-पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बसची आग विझविल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.