
पालिकेच्या व्हॅक्सिनेशन सेंटरवर आता मुंबईतील खासगी रुग्णालयेही लसीकरण करणार आहेत. त्यामुळे सुमारे 100 खासगी रुग्णालयांत पडून असलेल्या तब्बल तीन लाख डोसचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शिवाय मुंबईचे 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ‘सीएसआर’ योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात पालिका आणि खासगी रुग्णालयाचे कर्मचारी काम करणार असल्याची माहिती खासगी रुग्णालय समन्वयक डॉ. गौतम भन्साली यांनी दिली.
मुंबईत 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. सद्यस्थितीत मुंबईत पालिका, खासगी आणि सरकारी अशा 438 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांपैकी 100 टक्के जणांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे, तर सुमारे 98 टक्के जणांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. दरम्यान, लसीकरण सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांनी मोठय़ा प्रमाणात डोस घेऊन ठेवले होते, मात्र ‘आयसीएमआर’ने परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात पालिका आणि सरकारची लसीकरण केंद्रे सुरू झाली. खासगी रुग्णालयांत एका डोससाठी 780 रुपये मोजावे लागत असताना पालिकेच्या आणि सरकारी केंद्रांवर मोफत डोस मिळत असल्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पालिका आणि सरकारी केंद्रांनाच पसंती दिली, मात्र यामुळे खासगी केंद्रांकडील कोव्हिशिल्ड लसीचे सुमारे तीन लाख डोस मात्र पडून राहिले. विशेष म्हणजे या डोसची एक्सपायरी डेट एका महिन्यावर आली असल्याने खासगी रुग्णालयांचे आर्थिक नुकसान आणि डोसही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला होता.



























































