
मुंबई महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेच्या आराखडय़ावर 812 हरकती-सूचना आल्या असून यातील सुमारे निम्म्या हरकती, सूचनांवरील सुनावणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. नरीमन पॉइंट येथील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात आज समितीसमोर सुनावणी झाली. यावेळी पश्चिम उपनगरातील हरकती-सूचना दाखल केलेल्या 390 जणांना बोलावण्यात आले होते. यातील 290 जणांनी सुनावणीसाठी हजेरी लावली.
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीत निकडून आलेल्या नगरसेककांची मुदत 7 मार्च रोजी संपत आहे. त्याआधी निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र कोविडमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला यावर्षी उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पालिकेच्या नव्या प्रभाग रचनेला मंजुरी दिल्यामुळे प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत. शिवाय वॉर्डची संख्याही 227 करून 236 होणार आहे. यावर दाखल झालेल्या हरकती-सूचनांवर आजपासून सुनावणी सुरू झाली.
आज सुनावणी पूर्ण होणार
मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील सूचना-हरकतींवर उद्या बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. समितीत राज्याचे अप्पर मुख्य सचिव (वित्त विभाग), पालिका आयुक्त, शहर आणि उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांंचा समावेश आहे. उद्या सर्व हरकती-सूचनांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर समिती आपला अहवाल निवडणूक आयोगाला देणार आहे. निवडणूक आयुक्त यावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.




























































