
रोजच्या वापरात असलेला फोन जर अचानक हरवला तर आपण अस्वस्थ होतो. फोन हरवल्यानंतर आपल्या शरीराचा एखादा अवयव नाहीसा झाल्यासारखं वाटू लागतं. हरवलेला फोन शोधूनही न मिळण्याची शक्यता जास्त असल्याने आपण बऱ्याचदा प्रयत्न सोडून देतो. पण, एका महिलेला चक्क दहा वर्षांनी तिचा हरवलेला फोन सापडला आहे आणि तो देखील अनपेक्षित ठिकाणी!
अमेरिकेतील मेरिलँड येथे राहणाऱ्या बेकी बेकमॅन नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. 2012मध्ये हॅलोविन या उत्सवाच्या काळात एक दिवस बेकीचा फोन अचानक गायब झाला. वास्तविक ती घराबाहेरही पडली नव्हती. पण, तरीही हवेत विरून गेल्यासारखा तिचा फोन नाहीसा झाला होता.
बेकी आणि तिच्या नवऱ्याने फोन शोधायचा बराच प्रयत्न केला. पण, तिला तो सापडलाच नाही. अखेर तिने जड अंतःकरणाने दुसरा फोन घ्यायचं ठरवलं आणि नवीन फोन घेऊन तो वापरू लागली. दहा वर्षांनी एक दिवस त्यांच्या घरच्या कमोडमध्ये फ्लश केल्यावर काहीतरी आपटल्याचा आवाज आला.
सुरुवातीला त्यांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण, तो आवाज थांबत नव्हता. अखेर हा आवाज येतो कुठून याचा शोध घेण्यासाठी बेकीच्या नवऱ्याने प्लंबरला बोलवलं. त्यांनी ती टाकी उघडली तेव्हा त्यात फोन त्या टाकीत सापडला. हा फोन तिथे गेला कसा आणि एवढी वर्षं तो दिसला कसा नाही, याचं आश्चर्य हे दांपत्य करत आहे.



























































