
केंद्रातील मोदी सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेचा कितीही गाजावाजा करण्यात येत असला तरी वास्तव भयंकर आहे. युक्रेनमध्ये अद्याप हजारो हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले असून, ही मोहीम फेल गेल्याचा आक्रोश करीत आहेत. सुमी शहरात अन्नपाण्याविना अडकलेले हे विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन शेकडो किलोमीटर चालत सीमेकडे निघाले आहेत. क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. आमच्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास मोदी सरकार जबाबदार असेल, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर एक विद्यार्थी चार गोळय़ा लागल्यामुळे गंभीर जखमी आहे. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले आणि त्यानंतर केंद्र सरकारला जाग आली. युक्रेनमध्ये 20 हजार विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यातील 13 ते 14 हजार विद्यार्थ्यांना हिंदुस्थानात परत आणल्याचे केंद्र सरकार म्हणत असले, तरी आकडेवारीबाबत वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अधिक संभ्रम वाढला आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह, दुसरे मोठे शहर खारकीव्ह येथे आजही काही विद्यार्थी अडकले आहेत. सुमी स्टेट युनिर्व्हसिटीत शिकणारे एक हजार हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या जवळ खायला अन्न नाही, पाणीही नाही. हिंदुस्थानी दुतावासाशी अनेकदा संपर्क केला, पण अधिकारीच कीव्ह सोडून गेले आहेत. केंद्र सरकार काहीही मदत करत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन चालत निघाले आहेत. बॉम्ब वर्षाव सुरु असताना जीव वाचविण्यासाठी सीमेकडे त्यांची पायपीट सुरु आहे.
व्हिडिओत काय म्हटले आहे
विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारसाठी एक व्हिडिओ पोस्ट करीत आपली वेदना, आक्रोश व्यक्त केला आहे. ‘आम्ही सुमी स्टेट युनिर्व्हसिटीचे मेडिकलचे विद्यार्थी आहोत. आज युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाने नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावे म्हणून आज काही तासांची युद्धबंदी करत मानवतावादी मार्ग उघडला. युद्धबंदी असलेल्या शहरांपैकी एक मारियुपोल आहे. सुमीपासून मारियुपोल 600 कि.मी. दूर आहे. सुमीमध्ये मात्र सकाळपासून हल्ले सुरु आहेत. आम्ही घाबरलो आहोत. आम्ही दुतावासाकडून मदतीची खुप वाट पाहिली, पण काहीच मदत मिळाली नाही. आमचा धिर संपत चालला आहे. त्यामुळे आम्ही युक्रेनच्या सीमेकडे चालत निघालो आहोत. आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याची संपुर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि हिंदुस्थानी दुतावासाची असेल. आम्हाला काही झाल्यास ‘ऑपरेश गंगा’चे मोठे अपयश असेल. आमचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. आम्ही सीमेच्या दिशेने निघालो आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहोत’, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
सुमी शहरापासून पोलंड, रोमानियाची सीमा 1200 ते 1400 किलोमीटरवर आहे. तिथंपर्यंत जाण्यासाठी बसनेच 12 ते 14 तास लागतात. सुमीपासून रशियाची सीमा 50 ते 60 कि.मी.वर आहे. त्यामुळे हे विद्यार्थी रशियाच्या सीमेकडे चालत जात आहेत, की मारियुपोल शहराकडे? हे समजले नाही. मात्र, रशियन सरकारशी तातडीने केंद्र सरकारने बोलावे आणि विद्यार्थ्यांना रशियामार्गे मायदेशी आणावे, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रपती भवन निशाण्यावर; झेलेन्स्कीची ‘नाटो’वर नाराजी
युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने दहाव्या दिवशीही हल्ला सुरुच ठेवला. कीव्ह ताब्यात घेण्याचा रशियाचा डाव आहे. राष्ट्रपती भवनवर क्षेपणास्त्र डागले. मात्र, भवनाजवळ ते कोसळले. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की राष्ट्रपती भवनात नव्हते.
दरम्यान युक्रेनला ‘नो फ्लाय झोन’ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली. मात्र, ‘नाटो’ने फेटाळली आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांनी ‘नाटो’ विषयी जाहीर नाराजी व्यक्त केली.
दोन शहरांत तात्पुरती युद्धबंदी
युक्रेनमधील मारियूपोल व वोल्नोवाखा या दोन शहरांत रशियाने तात्पुरती युद्धबंदी जाहीर केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रशियाने युक्रेनमध्ये अडकलेले हिंदुस्थानी विद्यार्थी तसेच इतर परदेशी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास तयार असल्याची हमी दिली होती. मॉस्को वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 10 ते दुपारी 4 असा सहा तास युद्धविराम होता. कितीजणांनी युक्रेन सोडले याची आकडेवारी मात्र मिळाली नाही.
युद्ध थांबवतो, पण…
युद्ध तत्काळ थांबवतो, पण युक्रेनने आमच्या तीन मागण्या मान्य कराव्या असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. युक्रेन हा तटस्थ आणि गैर अणुऊर्जा देश असेल, क्रिमिया हा रशियाचाच भाग आहे हे मान्य करावे आणि पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचे स्वातंत्र्य मान्य केले जावे अशा या तीन मागण्या असल्याचे पुतीन यांचे कार्यालय क्रेमलीनने म्हटले आहे.




























































