
सोलापुरात स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या कोटय़वधी रुपयांच्या केबल उघडय़ावर ठेवण्यात आल्या असून, आज दुपारी या केबल्सना अचानकपणे आग लागली. यात कोटय़वधी रुपयांच्या केबल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. पालिकेच्या अग्निशामक दलाने फोम केमिकलचा वापर करून ही आग नियंत्रणात आणली. दरम्यान, या आगीच्या झळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरापर्यंत पोहोचल्या होत्या.
भूमिगत वीजवाहिनीच्या कामासाठी स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत कोटय़वधी रुपयांच्या केबल खरेदी करण्यात आल्या आहेत. सुरक्षेचा विचार न करता या केबल्सचे बंडल होम मैदानावर उघडय़ावर ठेवण्यात आले आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास या केबल्सना अचानकपणे आग लागली. फायबर पाईपमुळे काही क्षणातच आगीचे लोळ आकाशात पसरले. जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापर्यंत झळा पोहोचत होत्या. यामुळे खळबळ उडाली.
या आगीची माहिती मनपा अग्निशामक दलाला कळताच सावरकर मैदान, भवानी पेठ, होटगी रोड येथील केंद्रातून अग्निशमन बंब मागविण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे व त्यांच्या पथकाने यावेळी फोम केमिकलचा वापर करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत केबलचे 7-8 बंडल भस्मसात झाले असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बेजबाबदारपणा
आगीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, या आगीच्या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. स्मार्टसिटी अंतर्गत खरेदी करण्यात आलेले हे साहित्य उघडय़ावर व सुरक्षेची काळजी न घेण्याबाबत बेजबाबदारपणा असल्याची घटनास्थळी चर्चा होती. आकाशात यामुळे काही काळ काळोख पसरल्याचे दिसत होते.
























































