निवडणुकीच्या 2-3 महिने आधी जागे होऊन भाजपला हरवणं अशक्य आहे, किशोर यांचे परखड मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून भाजपाला तिथे आपली सत्ता राखण्यात यश आले आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले कि भाजपाला हरविण्यासाठी जमिनीवर उतरून काम करावे लागेल. तुम्ही कितीही मोठे नेते असलात तरी 2-3 महिने अगोदर जागे व्हाल आणि तयारीला लागून भाजपाला हरवू म्हणाल तर ते अशक्य आहे असं किशोर यांनी म्हटलंय.

इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, यंदाच्या निवडणूक प्रचारात समाजवादी पक्षाकडे भाजपविरोधात कोणताही बिनतोड मुद्दा नव्हता. म्हणूनच समाजवादी पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. यावेळी निवडणूक निकालांबाबत ते म्हणाले कि विरोधी पक्षात सरकारला आव्हान देणारा नेता बसविण्यात पक्ष अपयशी ठरले आहेत.

राज्यात प्रबळ विरोधक किंवा आव्हान देणारा एक मजबू आणि लोकांचा विश्वास असलेला नेता लोकांसमोर आणण्यात सफलता हाती लागलेली नाहीये. समाजवादी पक्षाचं उदाहरण देताना किशोर म्हणाले की त्यांचा निवडणूक प्रचार भरकटलेला वाटत होता. त्याउलट पश्चिम बंगालमधील प्रचार बघितला तर ममता बॅनर्जी या दिवसरात्र निवडणुकीसाठी मेहनत घेत होत्या. 1-2 महिने नाही तर त्या 2-3 वर्ष सातत्याने मेहनत करत होत्या. झंझावाती निवडणूक प्रचार झाले तेव्हाच भाजपला पराभूत करणं शक्य झालं.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना मजबूत आव्हान देणारा पक्ष होता. या पक्षाकडे अखिलेश यादव हा चेहरा देखील आहे. मात्र त्यांच्याकडे समोरच्या पक्षाविरुद्ध लढण्यासाठी बिनतोड मुद्दे नव्हते असं किशोर म्हणाले. तुम्ही लोकांना आपल्याकडे आकर्षित करणारा नेते असाल, तुमचा पक्ष कितीही मजबूत असेल मात्र जर तुम्ही निवडणुकीच्या 2-3 महिने आधी जागे होत असाल, आणि नुसतं भाजपला शिव्याशाप देण्याचं काम करत असाल तर हे उपयोगी पडणारं नाही. उत्तर प्रदेशची निवडणूक याचा एक सबळ पुरावा आहे.

मोदी आणि योगी यांना हरविण्यासाठी तुमच्याकडे चांगला बिनतोड मुद्दा पाहिजे. उत्तर प्रदेश निवडणुकीत विरोधी पक्षांच्या हे बिनतोड मुद्दे दिसले नाहीत.  निवडणूक प्रचार हे केवळ एक अभियान म्हणून पाहू नये. अन्यथा हार पत्करावी लागते. निवडणुकीत जिंकण्यासाठी नेत्यांना जमिनीवर उतरून लढणे गरजेचे आहे असं किशोर यांनी म्हटलंय.