अभिप्राय : प्रदक्षिणेतून पर्यटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

हिंदुस्थानातली ऐतिहासिक वास्तुरचना, मंदिरं जिज्ञासूंना, अभ्यासकांना खुणावतात. हा वैभवशाली इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून अभ्यासला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून या वास्तूंचं सौंदर्य अभ्यासत ते लेखांच्या माध्यमांतून मांडणारं मुक्ता केणेकर यांचं ‘प्रदक्षिणा’ हे पुस्तक. या पुस्तकातून काही निवडक तीर्थक्षेत्रांची माहिती आढळते.

लेखिका मुक्ता केणेकर यांची पर्यटनाची, भटकंतीची आवड आणि या संदर्भातील अभ्यासाची जोड त्यांच्या लेखनातून आढळते. पुस्तकातील सर्व लेख म्हणजे लेखिकेचे स्वतंत्र अनुभव आहेत. मुंबईलगत असलेले टिटवाळा महागणपती मंदिर, अष्टविनायक प्रदक्षिणेतील एक मोरगाव मंदिर, जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरची करवीरनिवासीनी अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, सिद्धटेक, पंढरपूर अशा नेहमीच्या परिचयातील ठिकाणांसोबत वेरुळ, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, नेवासा, सज्जनगड, गाणगापूर, अंबाजोगाई, नांदेड येथील सत् श्री अकाल गुरुद्वार या ठिकाणांविषयी देखील रोचक माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील या परिचित ठिकाणांसोबत श्रीशैलम् आणि हरिद्वार या ठिकाणांची माहिती आर्वजून वाचावी अशी आहे. चारधामच्या यात्रेमुळे भाविकांचा ओघ हरिद्वारला असतोच. या ठिकाणचं हर की पैडी, दीपदान यांचं लेखिकेनं मांडलेले वर्णन शब्दातीत आहे.

टिटवाळा हे तसं अगदीच माहितीतील ठिकाण, परंतु त्याबद्दलच्या पुराणकथा, मूर्ती स्थापनेचा इतिहास लेखिका इथे देतात. याचप्रमाणे अंबेजोगाईचं स्थळकाळदर्शन लेखिकेने यात घडवलं आहे. इथली शैवलेणी, जोगाईचे माहेर, मुकुंदराज व दासोपंत यांची समधी मंदिरं अशा अनेक गोष्टींची माहिती यात आढळते. माहिती देताना लेखिकेने कोणतेही संदर्भ सुटणार नाहीत याची काळजी घेतली आहे. प्रत्येक ठिकाणचा लेख त्यामुळेच परिपूर्ण ठरला आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने या पुस्तकातील ही सर्व ठिकाणं परिचयाची असली तरी प्रत्येक ठिकाणची वेगळी माहिती, त्या ठिकाणांचं धार्मिक अधिष्ठान, त्याचं याचं वर्णन करताना लेखिकेने कुठेही हात आखडता घेतला नाही. संतसाहित्यातील एखादं पद तर कुठे ओवीबद्ध रचना मांडत या लेखांचं साहित्यिक मूल्य अधिक वाढलं आहे. पर्यटनविषयक लेख माहितीपर होण्याची जास्त शक्यता असते, परंतु लेखिकेने ललितबद्ध स्वरूपात केलेले हे लेखन कुठेही पंटाळवाणे वाटत नाही. याबरोबरच त्या त्या ठिकाणाचे पौराणिक, ऐतिहासिक संदर्भही जागोजागी दिले आहेत. त्यामुळेच लेख सर्वांगीण होण्यास मदत झाली आहे. निखळ पर्यटनाचा आनंद देणारं असं हे पुस्तक असल्याने यात दिलेल्या प्रत्येक माहितीचा शास्त्र क्त संदर्भ लावणं चुकीचं ठरेल. भटपंतीचा आनंद आणि तीर्थक्षेत्रांची प्रदक्षिणा असा दोन्हींचा आनंद देणारं हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल.

प्रदक्षिणा
लेखिका – मुक्ता केणेकर
प्रकाशक – मनोरमा प्रकाशन
पृष्ठे –  166, मूल्य – रुपये 150/-